कराड(,प्रताप भणगे )
: कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या परंपरेनुसार शहरातील ऐतिहासिक स्मारकांना अभिवादन करून आपल्या कामाची सुरुवात केली.
रविवारी 21 सप्टेंबर रोजी नामदेवराव पाटील यांनी सर्वप्रथम कराड शहराच्या मध्यवर्ती दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दर्शन घेतले. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना त्यांनी शिवरायांचे आदर्श समाजापर्यंत पोहचवण्याचा संकल्प व्यक्त केला. यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींच्या स्मारकास अभिवादन करून दर्शन घेतले.
यानंतर नामदेवराव पाटील यांनी प्रीतीसंगम येथे जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळास अभिवादन केले. तसेच पाटण कॉलनी येथील स्व. प्रेमीलाकाकी चव्हाण व आनंदराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण व प्रेमीलाकाकी चव्हाण यांच्या विचारांचे स्मरण करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी त्यांच्या विकासदृष्टीचा आदर्श घेऊन काम करण्याचा निर्धार केला.
पुढे त्यांनी कराड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्य करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकासही अभिवादन करून सामाजिक न्याय आणि शिक्षण प्रसाराच्या चळवळीला पुढे नेण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. यामध्ये युवानेते इंद्रजीत चव्हाण, झाकीर पठाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, वाघमारे, सुभाषआबा पाटील, संजय तडाखे, सुरेश भोसले, शिवाजीराव जमाले, रवी बडेकर, नानासो जाधव, वैभव थोरात, शब्बीर मुजावर, दिपक पाटील, भगवान सुतार, उमर सय्यद, अवधूत पाटील, मुजीर इनामदार, तानाजी घारे, पंकज पिसाळ, एल जे देसाई यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या भेटीदरम्यान शहरभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. नामदेवराव पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नवे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली.