मुंबई (रमेश औताडे) : गल्ली पासून दिल्ली पर्यंत, ग्रामसेवकापासून पंतप्रधान यांच्यापर्यंत निवेदन देणे, निवेदनाचे स्मरणपत्र देणे, स्मरणपत्र दिले आहे हे सांगण्यासाठी पुन्हा निवेदन देणे. तरीही न्याय मिळत नाही म्हणून आंदोलन इशारा देणे. सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन थांबवायचे व पुन्हा पुढील अधिवेशनात आंदोलन करायचे. असे आणखी किती दिवस आंदोलन करायचे ? असा सवाल आझाद मैदानात आपल्या मागण्या घेऊन आलेले आंदोलनकर्ते सरकारला विचारात आहेत.
शिक्षक, विद्यार्थी, शाळा संस्थाचालक, एम पी एस सी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी, ग्रामरोजगार सेवक, शेत जमीन बांध सरला म्हणून खून प्रकरणी न्याय मागणारे शेतकरी, सफाई कंत्राटी कामगार, पेन्शन धारक, कमी अवधीत पैसे डबल करणाऱ्या बोगस संस्था कंपनी विरोधातील गुंतवणूकदार, विधवा, अंध अपंग, पत्रकार संघटना, बिल्डर ने फसवणूक केलेले घर ग्राहक, आदिवासी, पारधी, गोंधळी, मातंग असे मागास समाज, ब्राम्हण समाज, राज्य परिवहन चालक वाहक, मंत्रालय कर्मचारी संघटना, ओला उबेर विरोधात रिक्षा टॅक्सी चालक मालक, असे अनेक आंदोलनकर्ते पावसाळा उन्हाळा हिवाळा या तिन्ही ऋतूत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर न्याय मागण्यासाठी मुंबईत आझाद मैदानात येत असतात.
आमरण उपोषण, चक्री उपोषण, इशारा उपोषण, धरणे आंदोलन, प्रणांकित उपोषण, थाळी नाद आंदोलन, बोंबाबोंब इशारा, अर्ध नग्न आंदोलन, पिपाणी कागदी घोडे नाचवत सरकारी बाबूंच्या विरोधात आंदोलन, अंध अपंगांचे घंटी नाद आंदोलन अशी अजून शेकडो प्रकारची आंदोलने करून आपल्यावरील अन्याय आझाद मैदानात मांडला जातो. त्यांच्यातील प्रमुख लोकांना पोलिस मंत्रालयात घेऊन जातात. मंत्री जर जागेवर असेल तर भेट होते नाहीतर त्यांचे सचिव समजूत काढून त्यांना आश्वासन देतात.
अशी आश्वासन पात्र घेऊन काही आंदोलन कर्त्यांची चार पाच ते काहींची दहा किलोची फाइल ( रद्दी ) जमा झाली आहे. करूया, बघुया, पाहूया, तीव्र कार्यवाही व्हावी, पुढील कार्यवाही साठी अग्रेशित असे शेरे मारलेके आश्वासन घेऊन पुन्हा गावी जायचे व पुढील अधिवेशनाची वाट पाहायची. सरकारने आगमी निवडणुकीच्या तोंडावर काही घटकाला आश्वासन दिली आहेत. मात्र ही आश्वासने पूर्ण होऊन ज्यावेळेस लाभ पदरात पडेल तेव्हा कुठे न्याय मिळाला असे आम्ही म्हणू. अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते देत आहेत.