
प्रतिनिधी(सौ विजया जितेंद्र माने) : कराड येथील शिवराय प्रतिष्ठानकडून आयोजित आगाशिव लेणी दर्शन या उपक्रमास कराड शहरासह तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह पालकांकडून भरभरून प्रतिसदा मिळाला. याच वेळी मार्गदर्शन करताना इतिहास संशोधक के. एन. देसाई यांनी या आगाशिव लेण्यांची वैशिष्ट्ये, रचना तसेच लेण्यांचा इतिहास याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या प्राचीन लेण्या कराडचा सांस्कृतिक वारसा असल्याचे के. एन. देसाई यांनी सांगितले.
कराडमधील शिवराय प्रतिष्ठानकडून जखिणवाडी परिसरातील आगाशिव लेणी दर्शन व मार्गदर्शन या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास संशोधक के एन देसाई यांची उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिजेश रावळ, सचिव रणजित शिंदे, उपाध्यक्ष राजेश तावरे, खजिनदार मुकुंद पोतदार सदस्य अभिजीत जाधव, विश्वास खांबे, शंकर हराळे, अभिजीत रैनाक, प्रकाश शितोळे, जयकुमार सोनी यांनी या उपक्रमाचे महत्त्व व आयोजनामागचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मौलिक सूचना दिल्या.
प्रारंभिक के. एन. देसाई यांनी विद्यार्थ्यांना आगाशिव लेण्यांचे महत्त्व आणि लेण्या पाहताना कोणते अवशेष व वैशिष्ट्ये यांचे आकलन करावे ? याबाबत सूचना केल्या. शालेय विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांनी आगाशिव लेण्यांची पाहणी केल्यानंतर के एन देसाई यांनी विद्यार्थ्यांना लेण्यांचा इतिहास, लेण्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे प्रकार, उपप्रकार याबाबत मार्गदर्शन केले. आगाशिव लेण्या इसवी सन पूर्व काळातील आहेत. या लेण्या महाराष्ट्रातील सर्वाधिक प्राचीन लेण्यांपैकी एक असून त्या अत्यंत दुर्मिळ आहेत. आपण अजंठा वेरूळ यासह अन्य लेण्या पाहण्यासाठी जातो. मात्र अजंठा वेरूळ लेण्याहून आपल्या आगाशिव लेण्या प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कराडचा हा सांस्कृतिक वारसा आहे. लेण्यांमधील खांब चौकोनी असून असे खांब फार दुर्मिळ आहेत. त्याचबरोबर लेण्यांभोवती पाण्याचे टाके तसेच अन्य अवशेष पहावयास मिळतात. आगाशिव परिसरात चचेगाव, कोयना वसाहत या परिसरातील लेण्या असून काही लेण्यांचे काम अर्धवट राहिल्याचे पहवयास मिळते. पूर्वीच्या काळी तक्षशिला व नालंदा या दोन विद्यापीठांमध्ये मुलांना शिक्षण दिले जात होते. याच नालंदा विद्यापीठाच्या शाखेचा अपभ्रंश होऊन नांदलापूर हे नाव पडले असून या लेण्यांचा सांस्कृतिक वारसा, निर्मिती मागचा उद्देश, रचना आपण सर्वांनी समजून घेणे काळाची गरज आहे. शिवराय प्रतिष्ठानकडून हे कार्य होत असून शिवराय प्रतिष्ठानच्या अशा उपक्रमात कराडकरांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहनही के. एन. देसाई यांनी केले.
यावेळी पालकांसह गणेश खांबे, सुरेश कोळी शिवराज माने बाजीराव जगदाळे शरद रामदुर्गकर सागर कळसकर आणि चंद्रशेखर वीर यांच्यासह शेकडो पालक, नागरिक यावेळी उपस्थित होते. ज्योती कोळेकर आणि रोहिणी रामदुर्गकर यांनी या उपक्रमास उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. सूत्रसंचालन माहेश्वरी जाधव व निर्मला माने यांनी केले.
मुलांना बक्षीस आणि गडकोटांची माहिती….
मुलांना मोबाईलपासून दूर नेत त्यांना गडकिल्ले पाहण्यासह त्यांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करण्यासाठी शिवराय प्रतिष्ठानकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी मुलांना शालोपयोगी साहित्य भेट देत शिवराय प्रतिष्ठानने भविष्यात मुलांनी गडकोट भ्रमंती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही देण्यात आले.