प्रतिनिधी : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयातून पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे यांनी या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला मोठा इशारा दिला. जालन्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची आज सरकारसोबत बैठक पार पडत आहे. असं असताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारच्या 9 मंत्र्यांना पाडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. “बरं वाटत नसल्याने पुन्हा इथं आलो. एकत्रित टोळी येऊन घाला घालत असेल तर काय बोलावे? ते नेते तुटून पडले. आमचं बळकावू पाहताय, मराठ्यांच्या नेत्यांची मस्ती इथं उतरेल. येवला वाला लै दिवसाचा म्हणतोय नोंदी रद्द करा म्हणून आणि त्यांची टोळी आहे, आता रद्द करा म्हणतात. आता मंडल कमिशनने 14 टक्के आरक्षण दिले आहे. त्यापुढचे सगळे रद्द करा आणि ते 14 टक्के ही रद्द करा ही आमची मागणी आहे. आता करणार का पूर्ण?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
“मराठ्यांच्या सापडलेल्या नोंदी रद्द करा म्हणताय ते आता कळलं का सरकार पूरस्कृत आंदोलन आहे की नाही? आता तर बघा काय सुरुय, मराठ्या नेत्यांनी डोळे उघडा आता. शेकडो वर्षांच्या नोंदी रद्द करा म्हणतात ही लोकं. 70 वर्ष खोटं बोगस आरक्षण खाताय, तरी मराठा म्हणत नाहीत, या नोंदी रद्द करा म्हणून आणि आज गरीब मराठ्यांच्या पोरला मिळतंय तर यांची आग होतेय”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. नियत, द्वेष यांची उघडी पडली बघा. बघा कोण किती जातीयवादी आहे ते. सगळे ओबीसी नेते सुद्धा आता उघडे पडले. अजून वेळ आली नाही. ओबीसी बांधवांचे वाटोळं करायचं आमचा विचार नाही. पण लक्षात ठेवा मंडल कमिशन चॅलेंज होतो आणि रद्दही होतो”, असं जरांगे म्हणाले.
‘मी 9 मंत्री पाडणार’
“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मागणीही चांगली आहे. त्यांच्या व्यासपीठावर मराठे नेते बसत होते. चांगली गोष्ट आहे. मराठ्यांच्या नेत्यांनी त्यांच्याकडून शिकावे. पडला तर पडला. व्हा या जातीकडून. नोंदी रद्द करा म्हणतात. मी माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय. अन्याय होऊ देणार की नाही, आमच्या ध्यानात आले. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावाला पडून आमच्यावर अन्याय करणार असे दिसते. तुम्ही सरकार म्हणून फूस लावता. त्यांना आंदोलनासाठी तुम्हीच उभे करता, मी तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. तो येवलावाला चाब्रा आहे. त्याला राजकीय आयुष्यातून उठवेल. गाड्या पुरवितो. आमच्या आमच्यात लावून देतो. लढणाऱ्या लोकांनाही कळत नाही. त्यांना राज्यातील पडलेली गँग साथ देतेय. आता बघूला बघू उत्तर देऊ. आम्ही तिथं आंदोलन केले म्हणून तिथं उभा करतात का? तुम्ही आम्हाला खिंडीत पकडता, डाव साधता. मी 9 मंत्री पाडणार. 13 तारखेनंतर सांगतो”, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
‘आता नाही का जातीयवाद?’
“जातीयवाद आम्ही सुरू केला म्हणतात. माधव पॅटर्न मी सुरू केला का? प्रति मोर्चे कुणी काढले? मी कुठला जातीयवाद केला? मी आरक्षण मागतो म्हणून मी जातीयवादी आहे का? महाज्योती चालते, बार्टी चालते, सारथीची आमची पोरं उपोषणाला, शाळेला त्रास होतोय. जातीय तेढ निर्माण होतेय. ट्राफिक जॅम होते म्हणून आजूबाजूच्या गावांनी निवेदन दिलीत. आता नाही होत आहे का जातीयवाद? तिथं जातीय तेढ निर्माण होते म्हणून आम्ही आलो गेलो नाही. आता मी अंतरवलीमध्येच राहणार. गावकरी म्हणताय तर नको म्हटलं, शहागडमध्ये कार्यालय टाकू. मात्र आता येवलेवाल्यानी तिथेच आंदोलन सुरू केलंय. आता नाही का जातीयवाद?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
‘तू आता आलाय आणि आम्हाला शिकवतोय’
“ओबीसी नेते एकत्र आले. माझं दुखत नाही पण नोंदी रद्द करा. आम्हाला चालणार नाही. कुणबी मराठे एकच आहेत, हे लक्षात घ्या. यांनी कितीही बदनाम केले तरी मागे हटू नका. नोंदी रद्द करा म्हणतात. सहन करणार नाही, आमचे वावर आणि आमचे सातबारा आणि रद्द हे करा म्हणतात. आमचं 150 वर्षांचं आरक्षण आहे आणि हे म्हणताय आरक्षण बचाव, तू आता आलाय आणि आम्हाला शिकवतोय”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
“मंडल कमिशनने 14 टक्के आरक्षण दिलंय. बाकीचे बोगस आरक्षण काढून टाका. इतके वर्ष बोगस आरक्षण खाल्लं. ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन दबाव निर्माण केलाय. कितीही एकत्र येऊ दे. हा पठ्ठ्या आहे ना इथं. मी अंतरवलीला जाणार होतो. पण खूप थकलो म्हणूम हॉस्पिटलमध्ये आलो. जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवावी हा येवलावाल्याचा प्लॅन आहे. मात्र हे जास्त चालणार नाही. मराठा एक आहे. सिद्ध झाले आहे. प्रत्येकाला कळतंय की, मी मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय”, असं मनोज जरांगे म्हणाले.
