सातारा (अजित जगताप) : ग्रामीण भागातील एस.टी बस म्हणजे गोरगरिबांच्या प्रवासाचे हक्काचे वाहन आहे. आता शाळा महाविद्यालय सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना एस.टी बस शिवाय पर्याय नाही. शाळेतून मिळतोय एसटी पास पण विद्यार्थ्यांना लाभेना वेळेत एसटी प्रवास अशी अवस्था पाहण्यास मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शिक्षण व उच्च शिक्षण घेण्यासाठी गोरगरीब, कष्टकरी ,शेतकरी, शेतमजूर यांची मुले सकाळी सहा वाजता उठून रात्रीच्या मुक्कामी एस.टी. बसने सातारा शहराकडे शिक्षणासाठी येतात. दुपारी शैक्षणिक तास संपल्यानंतर त्यांना परतीच्या प्रवासाच्या वेळेला दुपारी बारा वाजता सुटणारी एस.टी. बस तीन वाजता मिळत आहे. ज्यांच्याकडे जेमतेम पैसे आहेत. अशी मंडळी वडापच्या वाहनाने आपल्या गावी जात आहेत. तर काहींच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांना तीन तीन तास एस.टी. प्रवासासाठी थांबवावे लागत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आल्यानंतर अनेक जादा बसेस पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. अशा वेळेला विद्यार्थ्यांना पांडुरंग.. पांडुरंग… म्हणण्याची वेळ येते. दि १५ जून पासून शाळा- महाविद्यालय सुरू झाले असून शासनाच्या एसटी महामंडळाच्या ६६ टक्के इतक्या तिकिटा मधील सवलतीमुळे अनेक विद्यार्थी हे एस.टी. बसचे पास काढून प्रवास करतात. दोन दिवस जरी पास काढण्यासाठी उशीर झाला तर एसटी बस प्रवासासाठी सवलत मिळत नाही. त्यांना संपूर्ण एसटीचे प्रवास भाडे भरावे लागते. काहींना एस.टी.तून प्रवास करणे याशिवाय पर्याय उरत नाही.
शासनाच्या पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. पास वितरण केलेले आहे. सातारा जिल्ह्यात दररोज एस.टी.चे नियमित प्रवासी आहेत. त्यामुळे एस.टी.तील प्रवासी व वाहक- चालक यांचा मेळ बसवताना प्रत्येक तालुक्यातील एस.टी. आगार व्यवस्थापकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्य सरकारने ७५ वर्षाच्या पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास तसेच दलित मित्र वनश्री, मित्र व अधिस्वीकृत पत्रकार, दिव्यांग, आजारी व्यक्ती व त्यांचे नातेवाईक व महिलांना ५० टक्के एसटी बस सवलत असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. त्या पटीमध्ये एस.टी. बस वाढलेल्या नाहीत. उलट प्रत्येक निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय असून सुद्धा कोणत्याही जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख होत नाही. ही बाब आता एस.टी. प्रवासी वर्गाला खटकू लागलेली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रामीण भागाची संपर्क वाहिनी आहे. अनेक पिढ्या या एस.टी बस सवलतीमुळे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. आताच्या शिक्षण घेणाऱ्या पिढीला एस.टी बस पास मिळतो पण एसटीची संख्या कमी असल्यामुळे रस्त्यावर अक्षरशा अनेकांना लिफ्ट मागावी लागत आहे. विद्यार्थिनी वर्गाची तर खूप मोठी हालत होत आहे . त्यांना वेळेत घरी जाण्यासाठी एसटी वेळेवर मिळणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे त्यांना कोणासोबत जाणं सुद्धा योग्य वाटत नाही. अशा वेळेला भुकेलेल्या विद्यार्थिनी या भूक मारून एस.टी.ची वाट पाहत असतात. एखाद्या फलाटावर एस.टी. लागणे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न समजून प्रवासी त्या एस.टी.मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत असतात. अशा वेळेला महिला ,जेष्ठ नागरिक, आजारी यांना मानसिक व शारीरिक कष्ट घ्यावे लागतात. अनेक जण स्वतःला जागा मिळाल्यानंतर दुसऱ्यासाठी जागा अडवून ठेवतात. अशा व्यक्तींना सवलत न देता त्यांच्याकडून पूर्ण एसटी भाडे द्यावे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश, सुनील भालेराव, अजित कंठे ,संतोष भंडारे व प्रवाशांनी केलेली आहे . दरम्यान, सातारा जिल्ह्यासाठी किमान दोनशे एस.टी बसेस ची आवश्यकता आहे कारण, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, मेढा, सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव, पाटण, कराड, माण एसटी आगारातून दररोज किमान दीड हजार फेऱ्या होतात. यामध्ये सातारा व कराड या दोन बस स्थानकात नेहमीच वर्दळ असते. याकडेही लक्ष देणे गरजेचे बनलेले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्षाकडे विद्यार्थी संघटना आहे. पण निवडणुकीचा प्रचार व विजिटिंग कार्ड व्यतिरिक्त त्यांच्याकडे अशा प्रश्न सोडवण्यासाठी सौजन्य उरलेले नाही. कारण विद्यार्थी संघटना म्हणजे राजकीय पद असून सामाजिक कार्य करण्यास त्यांना रस वाटत नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनीच केलेली आहे.
