मुंबई- रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती आणि आभियांत्रिकी कामांसाठी रेल्वे प्रशासनाने उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्यान काही गाड्या उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नसेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील माटूंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. हार्बर मार्गांवरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी डाऊन मार्गावरील सेवा आणि पनवेल /बेलापूर/ वाशी येथून सीएसएमटीकडे जाणारी डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत पनवेल – वाशी आणि कुर्ला – सीएसएमटी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.
