वडूज : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून अनेकांना रोजगार मिळत नाही. अशा वेळेला पोटाची खळगी भरण्यासाठी शासकीय दरातील रेशनिंग अन्नदात्याचे काम करतात .पण, खटाव तालुक्यात गेले दोन महिने पासून काहींना रेशनिंग मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. बाई.. बाई… बाई.. करावं काय? खटावात रेशनिंग मिळत नाही. अशी म्हणण्याची पाळी गोरगरिबांवर आलेली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ गट खटाव तालुकाध्यक्ष श्री सागर भिलारे यांनी याबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यामध्ये केशरी व पिवळे तसेच पांढरे असे रेशनिंग कार्डधारक आहेत. पूर्वी नियमितपणाने रेशनिंग मिळत असल्यामुळे पुरवठा शाखेबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. आता बारा अंकी कोड आणि आधार कार्ड लिंक केल्याशिवाय गोरगरिबांना रेशनिंग मिळत नाही. त्यामुळे अनेकदा रेशनिंग माघारी जाण्याची वेळ आलेली आहे.
माण – खटाव तालुक्यात ४१ हजार रेशनिंग कार्डधारक असून अनेकांनी आपले रेशनिंग विभक्त केल्यामुळे त्याला चार-पाच वर्षात रेशनिंग कार्डची संख्या वाढलेली आहे. नवलाईची गोष्ट म्हणजे रेशनिंग मिळत नसलेले अनेकांना उपासमारी सहन करावी लागत आहे. आणि याचा सर्वात मोठा फटका हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर व हमाली करणाऱ्यांना बसलेला आहे.
खटाव तालुक्यामध्ये ड्राय डेला एक वेळ सहज रित्या व्यसन पूर्ण करण्यासाठी दारू मिळेल पण सणासुदीला शासकीय रेशनिंग मिळत नाही. आचारसंहितेच्या नावाखाली आता रेशनिंग मिळत नसल्याचा जावई शोध काही कार्यकर्त्यांनी लावलेला आहे.
सध्या शहरी भागासाठी ५९ हजार व ग्रामीण भागासाठी ४४ हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनाच शासकीय रेशनिंग देण्याचा अध्यादेश काढलेला आहे. ज्यांचे उत्पन्न दाखला लिंक केलेला आहे. त्यांनाच रेशनिंग मिळत आहे. खटाव तहसील कार्यालयात दाखले काढणाऱ्यांसाठी आता काही कॅंडिडेट व कार्यकर्त्यांना उत्पन्नाचे चांगले साधन मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांनी पुरवठा शाखेला धन्यवाद दिलेले आहेत.
वाढत्या बेरोजगारीमुळे अधून मधून असे उत्पनाचे साधन सरकारने निर्माण करावे. अशी मागणी काहींनी केलेली आहे. खटाव तालुक्यामध्ये राजकीय अनेक रथी महारथी आहेत. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वेळ नाही नाही. अनेक लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित आहेत .त्यांची बाजू घेण्यासाठी दक्षता समिती, ग्राहक पंचायत आहे .पण, त्यांचीही बैठक न झाल्यामुळे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत. अन्न सुरक्षा २०१४ कायद्यानुसार एकत्र रेशनिंग कार्ड करण्यात आलेले आहे. तरी काही गरिबांना वेळेत रेशनिंग मिळत नसल्यामुळे हे कार्ड शोपीस झाले आहेत. रेशनिंगची वाहतूक करणाऱ्या वाहनाला जी.पी.एस .बसवणे बाबत श्री सागर भिलारे यांनी पत्र दिले होते. त्याची फारशी गंभीर दखल घेतलेली नाही. एकूणच या रेशनिंग विभागाचा कारभार सुधारणा करून गोरगरिबांचा धुवा मिळवावा यासाठी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. त्यापूर्वीच खटाव तालुक्यातील सर्व कष्टकरी गोरगरीब व गरजवंतांना त्यांचे हक्काचे रेशनिंग मिळावे असे निवेदनात सूचित केलेले आहे. जीवनावश्यक कायदा 1955 मधील तरतुदीनुसार रेशनिंग मिळणे सर्वांचाच अधिकार आहे याची आठवण करून देण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गरिबांना रेशनिंग मिळाले नाही तर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी सचिन भंडलकर अमोल बुधावले सचिन आगरकर अनिल उमापे विशाल भोसले प्रशांत शिवचरण महिला तालुकाध्यक्ष उषाताई जाधव आजींच्या निवेदनावर नावे आहेत. दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४ या कालावधीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर वारकऱ्यांनाच उपलब्ध करावे. कारण, गॅसचा वापर काही वाहन चालक करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल आहेत याकडेही लक्ष देण्याची मागणी केलेली आहे.
