
प्रतिनिधी : एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या आता संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबत घेतले जाणारे आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय या नव्या पध्दतीने मिळणार आहे. एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे ८७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.
१ मध्यवर्ती कार्यालय, ६ प्रदेश, त्या प्रदेशांतर्गत ३१ विभाग आणि या विभागांतर्गत २५१ आगार कार्यरत आहेत. त्याचबरोबर ३ मध्यवर्ती कार्यशाळा, ९ टायर पुनस्तःरण प्रकल्प आणि १ मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था असा एसटी महामंडळाचा अवाढव्य पसारा आहे. या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करतात, परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, बदल्यांमध्ये अनियमितत होत असते. परिणामी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांचे अर्ज वर्षानुवर्ष धुळखात पडलेले असतात. याला आळा घालण्यासाठी आणि सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय देण्याच्या हेतूने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या विशेष पुढाकाराने बदल्या संदर्भातील संगणकीय प्रणालीव्दारे ॲप महामंडळामार्फत विकसीत करण्यात येत आहे