तळमावले (संदीप डाकवे) : ‘‘मृगाची पेरणी…धनधान्य देई’’ अशी एक म्हण आहे. शुक्रवार दि.7 जूनला मृग नक्षत्र सुरु होत आहे. खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने या दिवसापासून सुरुवात होते. मान्सुनचे आगमन काही दिवसातच होईल. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या पेरणीची लगबग सुरु झाली असल्याचे चित्र दिसत आहे. याठिकाणी अजूनही पारंपारिक शेती अवजारांच्या माध्यमातून शेती केली जाते. नागर, कुळव, पाटे, 4 फणी, 6 फणी इ. अवजारांच्या सहकार्याने पेरणी केली जाते. एकदा पेरणी झाली की शेतकरी ही अवजारे व्यवस्थित सुरक्षीत जागी बांधून ठेवतात. पुन्हा पुढच्या पेरणीलाच ही अवजारे बाहेर काढली जातात. वर्षभर एका ठिकाणी असल्यामुळे काही अवजारांची मोडतोड होते अशा शेती अवजारांची दुरुस्ती करण्याचे काम सध्या मोठया प्रमाणात सुरु आहे. काही ठिकाणी बारा बलुतेदार ही पध्दत अजूनही असल्यामुळे सुतार वर्गाकडून प्रामुख्याने ही अवजारे दुरुस्त केली जातात. त्या बदल्यात त्यांना धान्य दिले जाते. मात्र काही ठिकाणी ही कामे पैशावर केली जातात.
काळगांव विभागामध्ये धुळवाफेवरील पेरणीला प्राधान्य दिले जाते. यामध्ये भात, सोयाबीन, भुईमुग, मका इ. पीके घेतली जातात. सध्या या भागात पेरणीची धांदल सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार माणसांनी गजबजलेला दिूसन येत आहे. यंदाच्या उन्हाळयात वळीवाचा पाऊस म्हणावा तसा चांगला झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग मे महिना संपत आला तरी तसा निवांतच होता. मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे काळगांव भागाला वारा आणि पावासाने झोडपून काढले आहे. त्यामुळे लोकांनी मशागतीला सुरुवात केली आहे.
या पावसामुळे आलेले तण, उन्हाळी नांगरटीमुळे निघालेले मोठमोठाले ढेकाळ पावसाने विरघळून गेले आहेत. त्यामुळे सर्वजण शेतीच्या कामात गुंतले आहेत. बांधाची जुळवाजुळव करणे, शेतीतील सड, पालापाचोळा काढून रान स्वच्छ करणे, खत विस्कटणे इ. कामे महिला करत आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळे लहान मुले देखील कामात मदत करत आहेत. तर पुरुष मंडळींकडून शेतीची अवजारे दुरुस्त करुन घेण्याची धांदल सुरु आहे. नांगर, फाळ, इडी, कासरे, कुळव, पास, जानावळे, 4 फणी, 6 फणी, त्याला लागणारे नळ, चाडी इ. सहित्याची जुळवाजुळव करण्यात शेतकरी वर्ग गुंतला आहे. त्याचबरोबर मोडलेले साहित्य दुरुस्त करण्याची लगबग पण सुरु आहे.
आधुनिक पध्दतीने लोक शेती करत असले तरी ग्रामीण भागातील अजूनही परिस्थिती तशीच आहे. त्याला कारणही तसेच आहे. ही शेती पारंपारिक पध्दतीने केली जाते. डोंगर कपारीतील अडचणीच्या जागेवर असणारी शेती, शेतांचा छोटा आकार असल्यामुळे ट्रैकटर किंवा अन्य शेती यंत्रे या ठिकाणी जावू शकत नाहीत. त्यामुळे लोक पारंपारिक अवजारे वापरण्याकडे लक्ष देत आहेत. एकंदिरत शेती अवजारांची ही कामे उरकण्याची गडबड सुरु आहे.
पेरणीमुळे सर्व लोक शेतामध्ये दिसत आहे. सर्व शिवार माणसांनी फुलून गेला आहे. काळगांव विभागातील डाकेवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, करपेवाडी, मस्करवाडी, चोरगेवाडी, वेताळ, निवी, सलतेवाडी, मत्रेवाडी इ.वाडया वस्त्यांवर सध्या धुळवाफेवरील मशागतीची तसेच पेरणीची लगीनघाई सुरु असल्याचे दिसून येत आहे.
चौकटीत :
सध्या शेत शिवार माणसांनी गजबजून गेला आहे. पेरणीच्या व शेतीच्या कामात एकमेकांना सहकार्य करण्याची भावना अजूनही लोकांच्या मध्ये आहे. एका मालकाच्या शेताच्या बाजूला दुसऱ्या मालकाची असलेली शेती एकाच औताच्या साहय्याने करण्यास लोक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एकोप्याची भावना अजूनही कायम असल्याचे दिसते.
– श्री.भरत डाकवे, शेतकरी