तळमावले/वार्ताहर : दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. यंदा किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो शिवप्रेमी नेहमीच अनोख्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करत असतात.
याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाड़ी (काळगांव) येथील शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी चक्क कवडीवर चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारला आहे. काळ्या रंगामध्ये सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत. याद्वारे अनोखी शिवभक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
जवळपास 1.5 सेमी×1 सेमी इतक्या कमी पृष्ठभागावर भव्य सोहळा रंगांच्या माध्यमातून त्यांनी हे दृश्य रेखाटले आहे. चित्रकार डॉ.डाकवे यांनी सादर केलेला हा कलाप्रकार छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, असंच यातून भासत आहे. यापूर्वी त्यांनी शाळेच्या भिंतीवर ऑइल पेंट ने आणि कागदावर दोन वेळा पोस्टर रंगातून शिवराज्यभिषेक साकारला होता.
