प्रतिनिधी : मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याच मतदारसंघातून लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता. यावेळी त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. प्रा. वर्षा गायकवाड यांच्या विजयाने काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून ही तर परिवर्तनाची सुरुवात आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रवक्ते व मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून विजय मिळवता होता व देशात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार आले होते. आजच्या विजयाने २००४ च्या निकालाची पुनरावृत्ती केली आहे. एकनाथराव गायकवाड यांच्याप्रमाणेच वर्षा गायकवाड यांचाही दांडगा जनसंपर्क असून सर्वसामान्य जनतेसाठी त्या काम करत असतात. धारावीच्या आमदार या नात्याने वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रश्नांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. धारावीकरांना विस्थापित करण्याच्या षडयंत्रालाही त्यांनी कडाडून विरोध करत संघर्ष करत आहेत. शिक्षण मंत्री या नात्यानेही त्यांनी चांगले काम केले आहे. आता संसदेत मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्या आवाज उठवतील व न्याय देतील असा विश्वास आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर टाकलेला विश्वास व जनतेने दाखवलेला विश्वासाला त्या तडा जाऊ देणार नाहीत, असे सांगून सुरेशचंद्र राजहंस यांनी प्रा. वर्षा गायकवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.