प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुक संपते ना संपते तोच विधान परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे लगेचच गुळवे यांची उमेदवारीही घोषित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी संदीप गुळवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जाहीर केलं आहे.
काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी आज उबाठा गटात प्रवेश केला. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. त्यांतर संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात झाल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत गुळवेंचा पक्षप्रवेश झाला.
संदीप गुळवे यांच्या पक्षप्रवेशानंतर राऊत म्हणाले, की संदीप गुळवे आणि शिक्षक बंधू यांचं स्वागत करतोय. आज संध्याकाळनंतर एक्सिट पोल प्रकार समोर येईल. पंतप्रधान मोदी ध्यान करत आहेत. आताच त्यांनी डोळे बंद केले आहेत. त्यांना आजचा हा शिवसेनेचा कार्यक्रम दिसत असेल. नाशिक शिक्षक मतदार संघात आपण संदीप गुळवे यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडी म्हणून ही लागा लढवत आहोत. मागच्या वेळी आपण शिवसेना उमेदवार निवडून आणला होता. संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा काम करत होती आणि त्यानंतर किशोर दराडे जिंकले. ह्या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे. कोणी सोडून गेला असेल तर त्याने काही होणार नाही. शिवसेना या 4 अक्षरात ताकद आहे. यामागे कोणीही उभा राहात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आपण संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदार संघाची उमेदवारी देत आहोत, त्यांनी सांगितलं त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्या. ते आपले उमेदवार असतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
अॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे 2012 ते 2017 पर्यंत ते सदस्य होते. राज्यात तळागाळापर्यंत पोहोचलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी ते निगडीत आहेत.
