प्रतिनिधी : महाराष्ट् विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद आणि बाजार समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी मिळण्यापासून विविध चर्चांना सध्या उधाण आलं आहे. त्यातच, राज्यातील शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 26 जून रोजी मतदान होत आहे. तर 1 जुलैला मतमोजणी आहे. यासाठी आता उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत असून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपकडे असलेल्या कोकणातील जागेवरच मनसेनं ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे, भाजपचा मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा आहे की, भाजपा विरुद्ध मनसे असा सामना होईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे, विधानपरिषद निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी भाजपाकडून पाठिंब्याची अपेक्षा करत आहेत. हिंदुत्वाच्या विचारांनी आम्ही लोकसभा सोडायची, विधानसभा सोडायची, महापालिका सोडायची असा आमचा पक्ष चालणार आहे का?, असा सवालही मनसेच्या अविनाश जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला केला आहे.