प्रतिनिधी : एक खरा शिवसैनिक आणि गद्दार शिवसैनिक अशी ही लढत होईल. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढणार आहे. समोर कोण आहे, याचा मी विचार करत नाही. मी जिंकण्यासाठी लढतो. जिंकायचं कसं, याचा मी विचार करतो. त्यामुळे समोर कोणत्या गटाचा उमेदवार असेल, याचा विचार मी करत नाही. ज्या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं. त्यांच्याविरोधात शस्त्र उचलवणार, हे त्यांच्या मनाला पटतय की नाही पटत, हा विचार फुटलेल्या शिवसेनेनं करावा. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्याविरोधात जो उभा राहिल, त्याला पराभूत करण्याचं आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार, असं मोठं विधान उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केले.
अनिल परब पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात माझी उमेदवारी जाहीर केली आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन मुंबईतील शिवसैनिक आणि पदवीधर मतदारांच्या साथीने या निवडणुकीला मी सामोरं जात आहे. मला नक्की यश मिळेल, असं मला वाटतं. कारण गेले तीस वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेनं स्वत:कडे ठेवला आहे. त्या मतदारसंघात शिवसेनेची घट्ट पकड आहे. शिवसैनिकांनी केलेली नोंदणी, त्यांचे पदवीधरांशी असलेले संबंध, या सर्व गोष्टींच्या जोरावर मी पुन्हा एकदा विधानपरिषदेत जाईल, असा माझा शंभर टक्के विश्वास आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्याने किती अडचणींना सामोरं जावं लागेल, यावर प्रतिक्रिया देताना परब म्हणाले, शिवसैनिकांची शिवसेना आहे. आजही शिवसैनिक नेते सोडले तर सर्वसाधारण शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. शिवसेना जरी फुटले असतील, तरी त्यांच्यासोबत आमदार, खासदार गेले आहेत. सर्वसामान्य शिवसैनिक हा आजही जागेवर आहे. तो शिवसैनिक माझा सच्चा कार्यकर्ता आहे. तो उद्याच्या निवडणुकीत काम करून शिवसेनेला विजयी करून देणार आहे. महायुतीत नेहमीचाच विषय आहे की, भाजप प्रत्येक गोष्टीत शिंदे गटाला चेपत आहे. शिंदे गटाने या जागेसाठी मागणी केली आहे, पण शिंदे गटाला ही जागा मिळेल, असं मला वाटत नाही. भाजपने दावा केला तर शिंदे गट काही करु शकेल, असे मला वाटत नाही.
