Thursday, April 17, 2025
घरमहाराष्ट्रमाजी विद्यार्थी महाविद्यालयाची शान आहेत : राजाभाऊ माने

माजी विद्यार्थी महाविद्यालयाची शान आहेत : राजाभाऊ माने

तळमावले(डाॅ.संदीप डाकवे) : माजी विद्यार्थी महाविद्यालयाची शान आहेत. रविवार दिनांक 19 मे, 2024 रोजी काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या 2008 मधील बी.कॉम तीन या वर्गाने स्वतंत्र मेळावा आयोजित केला. महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावे कॉलेज आयोजित करते. परंतू 2008 बी.कॉम.3 च्या बॅचने स्व खर्चाने  मैत्रीचा स्नेहमेळावा आयोजित करून काॅलेजमध्ये इतिहास घडवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. काकासाहेब चव्हाण कॉलेज ही माझी दुसरी माता असून तिच्या विकासासाठी आम्ही माजी विद्यार्थी संघ व आपण सर्वजण मिळून जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करूया व महाविद्यालयाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहूया असे आवाहन काकासाहेब चव्हाण माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजाभाऊ माने विद्यार्थ्यांना  केले. याप्रसंगी प्राध्यापक ए.बी.कणसे, डॉ.यु.ई.साळुंखे. वसंतराव हारुगडे उपस्थित होते.

‘‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी आपणाला शिक्षणाची गंगोत्री आपल्या घरापर्यंत दिली म्हणूनच तुम्ही आम्ही आज विविध पदावर आनंदात ताठ मानेने कार्यरत आहोत. या महाविद्यालयाची उतराई म्हणून आपण दहा हजार रुपयाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिलीत. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करते आणि ज्या ज्या वेळेला कॉलेजवर याल त्यावेळेला मी आपल्या स्वागतासाठी असेल, आपले असेच प्रेम महाविद्यालयावर राहू द्या असे मत डॉ.यु.ई.साळुंखे यानी व्यक्त केले.

प्रा.अधिकराव कणसे यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले.  ‘‘या महाविद्यालयांमध्ये आपण एक इतिहास घडवलेला आहात. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून 53 वर्षात पहिल्यांदाच एका वर्गाचा स्वतंत्र मेळावा आयोजित करण्याचा मान आपण पटकावलात. आपण इतिहास घडवणाऱ्यामध्ये आहात त्यामुळे मी आपणास अजून एक विनंती करतो की, आपल्या महाविद्यालयातील किंबहुना सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी बोलला पाहिजे, बोलत बोलत तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे याच्यासाठी तुम्ही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करावे. यासाठी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन असे तीन स्तर पाडून या प्रत्येक स्तरावरील स्पर्धकांना रु.1000/-, रु.751/-, रु.501/- असे पारितोषिक तिन्ही गटाला आपण द्यावे असे आवाहन प्रा.ए.बी.कणसे यांनी केले. 

प्रा.ए.बी.कणसे यांनी केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांनी लगेच दहा हजार रुपये महाविद्यालयाकडे देऊ केले तसेच शिल्ड स्वरूपामध्ये जी रक्कम लागेल ती रक्कम कृष्णत पवार यांनी पाच हजार रुपयाची शिल्ड देण्याचे मान्य केले.

श्रीकांत पाटील, रुपाली सावंत, कविता चाळके यांनी प्रत्येकी रू.5000/- देणगी दिली. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ.अरुण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. 

सदर प्रसंगी श्रीकांत पाटील, कविता माने, संजय भांडवलकर, शैलेश येळवे, कृष्णत पवार, सचिन गायकवाड, संदीप शिंदे, महादेव कदम, रुपाली सावंत, माया पाटील, राजेश मोरे, सविता कदम, सविता शिंगण, नयन पोतेकर, शीतल पाटील, विक्रम कदम, संदीप चव्हाण, हेमंत भालेकर, रंजना सावंत, हणमंत हारूगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी तुकाराम कदम यांच्यासह सुमारे 30 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्व विद्यार्थी आपल्या काॅलेजच्या आठवणीमध्ये रमून गेले होते. 

प्रारंभी स्वामी विवेकानंद, बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, काकासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमांचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले राजाभाऊ माने, प्रा.ए.बी.कणसे, डाॅ.यु.ई.साळुंखे, सौ.सुरेखा कणसे, वसंतराव हारुगडे यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला. कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी यांनी बांधलेले कोल्हापूरी फेटे कार्यक्रमाची उंची वाढवत होते. दरम्यान काॅलेजच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या काकासाहेब चव्हाण यांच्या पुतळयाला सर्वांनी अभिवादन केले. सुत्रसंचालन श्रीकांत पाटील व कविता माने यांनी केले. तर आभार प्रदर्शन महादेव कदम व माया पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच श्री.राजू दोडमनी, श्री.घुगरे ए.जी. यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments