ठाणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील अल-कायदा प्रकरणाशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने ठाण्यातील मुंब्रा-कौसा परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एटीएसने इब्राहिम अबिदी नावाच्या शिक्षकाच्या घरावर छापा टाकत त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम अबिदी हा मुंब्रा येथील कौसा भागात भाड्याने राहत होता आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत मुलांना उर्दू शिकवत असे. मात्र, त्याच्या वागणुकीत संशयास्पद हालचाली दिसल्याने एटीएसने त्याच्यावर गुप्त पाळत ठेवली होती. तपासादरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अबिदी हा शिक्षकाच्या माध्यमातून काही तरुणांना अतिरेकी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
एटीएसने छाप्यादरम्यान अबिदीच्या राहत्या घरासह कुर्ल्यातील त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घराचीही झडती घेतली. या कारवाईदरम्यान घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही सामग्री पुढील तपासासाठी आणि फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आली असून, त्यातून अल-कायदा प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या धाग्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
