तळमावले/वार्ताहर : राज्याच्या धाराशिव, बीड, मराठवाडा आदी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे जलमय झाली. या भागातील शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. अशा संकटाच्या काळात सामाजिक जाणिवेतून सर्व स्तरातून मदतीचे हात पुढे आले आहेत. चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने नुकताच साजरा झाला. यावेळी चि.स्पंदनने आपल्या खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना मदत करत खारीचा वाटा उचलला आहे. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
विद्यानगर (ता. कराड) येथील होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कूलमध्ये इ.5 वीत शिकणाऱ्या स्पंदनने आई-वडिल, आजी, आजोबा, मामा, मामी व अन्य नातेवाईक यांनी खाऊसाठी दिलेले पैसे साठवले होते. वाढदिवसानिमित्त या साठवलेल्या पैशातून तसेच ॲड.जनार्दन बोत्रे, सेवानिवृत्त फौजी जालिंदर येळवे यांनी दिलेल्या पैशातून स्पंदनने पूरग्रस्तांसाठी एकरेघी, दुरेघी, चाररेघी, चित्रकला वहया, स्केच पेन, शार्पनर आणि खोडरबर इ. आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदी केले. हे साहित्य सळवे येथील प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचे संस्थापक आनंद कदम व अन्य सभासद यांच्याकडे पुरग्रस्तांना देण्यासाठी स्वाधीन केले. पहिल्या वाढदिवसापासून आतापर्यंत सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा अखंडित राखली आहे. खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना केलेल्या छोटयाशा मदतीने व या सामाजिक जाणिवेच्या कृतीने शाळा, गाव तसेच समाजातून स्पंदनचे कौतुक होत आहे.
चि.स्पंदन डाकवे याचा आतापर्यंतचा आणि यापुढीलही प्रत्येक वाढदिवस ‘‘वाढदिवस स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा..!’’ या टॅगलाईनप्रमाणे साजरा करणार असल्याचे मत स्पंदनचे वडील संदीप डाकवे आणि डाकवे कुटूंबियांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी स्पंदनच्या वाढदिवसानिमित्त ‘नाम’ फाऊंडेशनला रु.35 हजाराचा निधी, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजाराचा निधी, ग्रंथतुला करुन जमलेली सर्व पुस्तके जि.प.शाळेला प्रदान, दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य वाटप, शांताई फाऊंडेशन ला जीवनावश्यक वस्तूंची मदत, गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी रु.6 हजाराची मदत, श्री बालाजी मतिमंद मुलांच्या शाळेस मदत, ऊसतोड कामगारांना दिवाळी कीट वाटप, इर्शाळवाडी पुरग्रस्तांना मदत, रुग्णास वैद्यकीय उपचाराकरिता रु.5 हजाराची मदत दिली आहे. अशाप्रकारे चि.स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत एका वेगळया उपक्रमाने साजरा केला जातोे.
सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डाॅ.संदीप डाकवे व डाकवे परिवार यांनी राबवलेले उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. या उपक्रमाला ॲड.जनार्दन बोत्रे, बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते.