पुणे – पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून पुणेकरांसाठी मोठी आणि ऐतिहासिक भेट मिळाली आहे. पीएम ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (PMPML) तब्बल १००० नव्या इलेक्ट्रिक बस मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा. एच. डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली असून, लवकरच या आधुनिक ई-बस पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि आधुनिक होणार आहे. या नव्या बससेवेच्या माध्यमातून वाहतूक कोंडी कमी होईल, कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि नागरिकांना अधिक आरामदायी, सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.
या प्रकल्पासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय साधत, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करण्यात आली. राज्य सरकारकडून रिझर्व्ह बँकेकडे आवश्यक पत्रव्यवहार पूर्ण झाल्यानंतर पीएमपीएमएलचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी तत्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते आणि आज त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
सध्या पुण्यात ३२ किलोमीटरवर मेट्रो सेवा सुरू आहे, तसेच शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहे. मेट्रोचे विस्तारित मार्ग, नव्या ई-बस सेवा आणि हरित वाहतूक योजनांचा संगम साधून पुण्याला “स्मार्ट, ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी” बनविण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत. तसेच या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे पुणेकरांच्या वाहतुकीत हरित क्रांतीचा नवा अध्याय सुरू होणार असून, पीएमपीएमएलचा ताफा अधिक सामर्थ्यवान आणि पर्यावरणस्नेही बनणार आहे.
