मुंबई : देशाला अभिमान वाटावा असे जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालय महाराष्ट्र सरकार बांद्रा येथील बीकेसीत उभारणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात राज्याचे माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री भाजप नेते आशिष शेलार यांनी ही घोषणा केली.
या संग्रहालयासाठी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो, असे शेलार म्हणाले. या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले आणि अजय वैद्य व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठीचा अभिजात दर्जा आणि वारसा जोपासणार्या दिवाळी अंकांसाठी अनुदान देण्यात यावे अशी विनंती करणारे निवेदन श्री. शेलार यांना यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघ, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंच, ग्रंथाली, दिवा प्रतिष्ठान दिवाळी अंक प्रकाशक संघ यांच्या वतीने देण्यात आले.
या वार्तालापात महाविकास आघाडीतील पक्षांवर, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (मनसे) शेलार यांनी जोरदार शब्दांत हल्लाबोल केला.
भाजपाला मुंबईचा महापौर गुजराती करायचा आहे या मनेसेच्या टिकेचा समाचार घेताना शेलार म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेत मुस्लिम महापौर करायचा आहे का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना? विशिष्ट धर्माच्या विरोधात चटुगिरी करणारे आता धार्मिक राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरे यांची सेना आणि मनसे मुस्लिम मतांसाठी हातमिळवणी करत आहेत. हे दोन्ही पक्ष मतांसाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार आहेत.’
शेलार म्हणाले, ‘राज ठाकरे यांना आता माझ्यात मित्रत्व दिसत नाही. ते स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी पुन्हा खोटे आरोप करत आहेत. मात्र जनतेला आता या नाटकांचा कंटाळा आला आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘आता महाराष्ट्रात महायुतीची सुनामी आहे. ही लाट एवढी प्रबळ आहे की आघाडीचे नेते गोंधळले आहेत. सत्ता गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आता पळापळ करत आहेत.’
मुंबईच्या प्रशासनावर आणि पूर्वीच्या सत्ताधार्यांवर टीका करताना शेलार म्हणाले, ‘चोरावर मोर होऊन आमच्यावर आरोप करणारे हेच लोक आहेत ज्यांनी आत्तापर्यंत मुंबई लुटली. मुंबईकरांच्या कराच्या पैशावर काही मोजके नेते सुखसोयी उपभोगत होते. आम्ही विकासासाठी काम करत आहोत, आणि हे लोक आरोपांच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी पुढे सांगितले, ‘महापालिकेत जे काही काम झाले ते कंत्राटदार आणि दलाल यांच्याच फायद्यासाठी झाले. मुंबईकरांच्या मूलभूत गरजा मागे पडल्या. भाजप सत्तेत आल्यास प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि जनतेच्या हिताचा असेल.
वोटिंग मशिन (Eन्न्श्) बाबत शंका उपस्थित करणार्यांना उत्तर देताना शेलार म्हणाले, जर वोटिंग मशिन सेटिंग असतील, तर लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे उमेदवार कसे जिंकले ? त्या जिंकलेल्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा, मग खरी प्रामाणिकता कळेल. मतदारांच्या निर्णयाचा अपमान करणे म्हणजे लोकशाहीचा अवमान आहे.’
मत चोरीचे आरोप करणार्यांनी आदित्य ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढावा. शेलार म्हणाले, ‘मतदानात मत चोरी झाली असे आरोप मनसे करत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढावा. तसेच महेश सावंत यांच्या घरावर मनसे आणि उद्धव गटाने मोर्चा नेला पाहिजे. जनतेला दिशाभूल करणारे हे राजकारण थांबले पाहिजे.
ज्ञानेश्वरीचा प्रसार माझा संकल्प — शेलार
राजकारणाच्या चर्चेनंतर आपल्या सांस्कृतिक उपक्रमांचा उल्लेख करत शेलार म्हणाले,
‘ज्ञानेश्वरी जगभर पोहोचवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा प्रसार हा माझा संकल्प आहे. महाराष्ट्राची संस्कृती, संतपरंपरा आणि मराठी भाषेचा अभिमान जगभर पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.
