जुन्नर – लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी करत आजपर्यंत ग्रामविकासात अग्रेसर असलेल्या बुचकेवाडी गावाने अनेक पुरस्कारांना गवसणी घातली आहे. वेबसाईट पाठोपाठ ग्रामपंचायतीची माहितीसह कर वसुलीसाठी घराच्या दर्शनी क्यूअर कोड लावून डिजीटल व्यवहार सुरु केला आहे. ग्रामपंचायत कामकाज डिजीटल होऊ लागल्याने आता नवी ओळख डिजीटल बुचकेवाडी झाली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वोत्तम कामगिरी करून नावाबरोबर तालुक्याचा लौकिक वाढवा,” असे आवाहन प्राचार्य विजय जाधव यांनी केले.
शिवजन्मभुमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यापासून जवळ असलेल्या बुचकेवाडी (जुन्नर) या गावाने आतापर्यंत लोकसहभागातून जलसंधारण, पर्यावरण, कृषी, आदर्श ग्रामपंचायत कामकाज, ग्राम विकासाशी सलग्न तब्बल ३० हून अधिक पुरस्कार पटकावून लक्षवेधी कामगिरी केली आहे. याच ग्रामपंचायतीने वेबसाईट पाठोपाठ आता कर संकलन प्रणाली विकसित करणारा क्यूअर कोड नेम प्लेट प्रत्येक घराच्या दर्शनी भागात लावत डिजीटल क्रांती केली आहे.
बुचकेवाडी गावात शनिवार दि.१ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता लोकनियुक्त सरपंच शिल्पा बुचके यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या ग्रामसभेत
प्रथम नेम प्लेट वितरण पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, माजी सरपंच सुदामशेठ डेरे, सावलेराम गवारी, ग्रा.प. सदस्य सचिन पवार, योगेश बुचके, अक्षदा केदार, गणेश गवारी, ग्रामपंचायत अधिकारी प्रदिप खिलारी, धनंजय डोके,देविदास पवार, अरुण डेरे, गणेश पवार, गोरक्ष बुचके, ॲड. गणेश डेरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ग्रामसभेत मार्गदर्शन करताना प्राचार्य विजय जाधव यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेतील १०० गुणांकन निकषांची सविस्तर माहिती दिली. घटक विषय गुणांकन मिळवण्यासाठी उपस्थितांशी चर्चात्मक संवाद साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज पवार यांनी केले.
