मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर आणि मतदार यादीतील गोंधळावर आक्षेप घेत महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आज (दि. १ नोव्हेंबर) ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामुळे संपूर्ण मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटवरून मोर्चाची सुरुवात झाली असून, तो मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते शरद पवार, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांसह अनेक युवा नेत्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आहे. चार प्रमुख पक्षांचे नेते एकत्र आल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने (भाजपा) गिरगाव चौपाटी येथे ‘मूक आंदोलन’ सुरू केलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करत असून, त्यांच्यासोबत मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, आमदार योगेश सागर, विद्या ठाकूर आणि प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित आहेत.
भाजपाने या आंदोलनाचं वर्णन “महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधातलं मूक आंदोलन” असं केलं आहे. दुपारी १ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन शांततेत पार पाडण्यात येत आहे.
मुंबईतील दोन्ही मोर्चांमुळे आज दिवसभर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून आले.
