मुंबई : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणारी काँग्रेस स्वतः धोक्यात आहे, अशी घाणाघाती टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. बुधवारी सायंकाळी बरकत अली नाका, वडाळा येथे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेत विधान परिषदेच्या सभापती सौ नीलम ताई गोऱ्हे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ, अभिनेते गोविंदा, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सचिन मोहिते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी या महायुतीच्या सभेला मोठी गर्दी करून राहुल शेवाळे यांना समर्थन दर्शवले.

महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून राज्य केले. आजही संविधान धोक्यात आहे असा अपप्रचार करून काँग्रेस दलित आणि मुस्लिमांना घाबरवत आहे. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसच धोक्यात आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसवर टीका केली त्याच काँग्रेस सोबत आज उद्धव ठाकरे गेले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर काढले असते, अशी टीकाही आठवले यांनी केली. महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही यावेळी आठवले यांनी केले
सिने अभिनेते गोविंदा यांनी आपल्या छोट्याशा भाषणात राहुल शेवाळे यांच्या कार्याचे कौतुक करत विकासाचे पर्व अखंडित ठेवण्यासाठी राहुल शेवाळे यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले
राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणात मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी माहिती सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेसमोर मांडली. कोरबा मिठागर परिसरातील पुनर्विकास हा राज्य सरकारतर्फे केला जाणार असून त्यासाठी धोरण निश्चिती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून दक्षिण मध्य मुंबईतून मला आशीर्वाद देण्याची विनंती ही यावेळी शेवाळ यांनी केली.
कोट
नव्याने उभारण्यात आलेल्या दादर टर्मिनसला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणार असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी वडाळा येथील सभेत दिली. तसेच संविधानाच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.