मुंबई- धारावीकरांचे पुनर्वसन वडाळा येथील मिठागर जमिनीवर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र या निर्णयाला वॉचडॉग फाऊंडेशन संस्थेने विरोध केला आहे.धारावीकरांचे पुनर्वसन या जागेत केल्यास मुंबईकरांना पूर आणि वादळाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत हे पुनर्वसन इतर पर्यायी जागेत करावे, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशन संघटनेचे पदाधिकारी गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
वॉचडॉग फाऊंडेशनच्या पत्रानुसार, मिठागराच्या जागेवर इमारती उभारल्यास भविष्यात मुंबईला धोका निर्माण होऊ शकतो. कारण समुद्रपातळीत वाढ होण्याचा सर्वाधिक धोका किनारपट्टीला बसणार आहे. २०५० पर्यंत समुद्र पातळीच्या संभाव्य वाढीचा फटका सुमारे ९९८ इमारती आणि २४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला बसणार आहे. हा धोक्याचा इशारा आरएमएसआय या संस्थेने काही वर्षांपूर्वी दिला आहे. त्यामुळे धारावी प्रकल्पात अपात्र ठरणाऱ्या रहिवाशांना मिठागर जागेत भाडेतत्त्वावर घरे देण्यासाठी इमारती बांधणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी दुसर्या पर्यायी जागेची निवड करावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशन या संघटनेने केली आहे.