पाटण : माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालयाच्यावतीने डाॅ.संदीप डाकवे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मानपत्र, शाल आणि तात्या पुस्तक देवून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल विक्रेते बांधवांनी आभार व्यक्त केले.
वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विक्रेते ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर कार्यरत असतात. सकाळी वेळेत वृत्तपत्र हाती पडल्याने वाचकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून विक्रेत्याला त्याचा मोठा आनंद होतो. सकाळी वाचकांना वेळेत वृत्तपत्र मिळावे यासाठी विक्रेता बांधव मोठे कष्ट करत असतात. तिन्ही ऋतुंमध्ये त्यांचे हे कार्य सुरूच असते. समाजात दुर्लक्षित राहिलेल्या पण वाचनसंस्कृतीसाठी महत्त्वाचे काम करणाऱ्या या घटकाला कृतज्ञतापूर्वक सन्मान मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या कार्यक्रमाचे आयोजन स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालयाच्यावतीने करण्यात आलेे होते.
