सातारा(विजय जाधव) : सातारा क्लब येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हरित सातारा फ्रंट वॉरिअर्स सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला आणखी व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार केला.
गेल्या तीन वर्षांपासून हरित सातारा अजिंक्यतारा व मंगळाई देवी परिसरात लोकसहभागातून वृक्षारोपण व त्याचे संवर्धन हे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करीत आहे. या कामात जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून याच कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी बैठकीत मागील कामाचा आढावा घेऊन आगामी नियोजनावर सखोल चर्चा झाली.
बैठकीत प्लास्टिक निर्मूलन, शासकीय पातळीवर आवश्यक बाबींसाठी पाठपुरावा, खालच्या मंगळाई टेकडीवरील वृक्षसंवर्धनासाठी पाण्याची टाकी उभारणे, तसेच सातारा शहर परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.
या बैठकीला हरित सातारा फ्रंट वॉरिअर्सचे कन्हैयालाल राजपुरोहित, संजय मिरजकर, सुधीर सुकाळे, दत्तात्रय चाळके, संजय झेपले, श्री. देशपांडे, अमोल कोडक, गोविंद बेलकर, संदिप वाघ, भालचंद्र गोताड, दिलीप भोजने, निखिल घोरपडे, अनिल मोरे, परमजीत सिंग, आशुतोष पाटोळे, राजेश पुराणिक, वेद अकॅडमीचे सागर लोहार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार तसेच अन्य पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.