मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान)” या आणखी एका नव्या पक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संदेश आंबेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी केली.
यावेळी संदेश आंबेडकर म्हणाले की, “संविधान धोक्यात आहे. संविधानाचे नाव घेत सत्तेपर्यंत पोहोचलेले लोकप्रतिनिधी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्याला पुढे नेत आहेत. समाजाला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपासून दूर करण्याचे कट कारस्थान रचले जात आहे.
पक्षाच्या ध्येयधोरणांवर भाष्य करताना त्यांनी संविधान वाचवणे, लोकशाहीचे रक्षण करणे आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यावर भर दिला.
पक्षाच्या सल्लागारपदी पूज्य भन्ते शिलबोधी थेरो असून, राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर, कार्यवाहक योगेश गायकवाड, सचिन भूटकर, महिला आघाडी प्रमुख राणीताई वाघमारे आणि ज्योतीताई गायकवाड यांसह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
संदेश आंबेडकर यांनी संविधान वाचवण्यासाठी सर्व भारतीयांना पुढे येण्याचे आवाहन केले. “संविधान हा भारताच्या आत्म्याचा पाया आहे. त्याचे रक्षण हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
संविधान व लोकशाहीवरील वाढत्या धोका आणि सामाजिक स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.