प्रतिनिधी ; धम्मचक्र प्रवर्तन दिन आता फक्त ऐतिहासिक स्मरणापुरता न राहता, तो सामाजिक बांधिलकीचा दिवस ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्याचा निर्धार ‘एक वही एक पेन अभियान’ने केला आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेला स्मरण करून देत अभियानाचे संयोजक राजू झनके यांनी सांगितले, “सम्राट अशोकाने धम्मचक्र गतिमान केले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर कळस चढविला. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला. आजही वंचित, उपेक्षित समाजातील अनेक कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण जाते, अशा स्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी साहित्य पुरवणे ही खरी बाबासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.”
या पार्श्वभूमीवर येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी समाजातील बांधवांना शैक्षणिक साहित्य, मिठाई आणि कपडे वाटून धम्मचक्र प्रवर्तन दिन दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “दहा धम्मबांधवांपैकी किमान एका बांधवाने जरी एखाद्या विद्यार्थ्याला एका वर्षासाठी शैक्षणिक साहित्य पुरवून दत्तक घेतले, तरी बाबासाहेबांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल,” असे झनके म्हणाले.
धम्म चक्र प्रवर्तन दिनी दादर चैत्यभूमी,नागपूरची दीक्षाभूमी ,महू येथील जन्मभूमी तसेच देशात ठिकठिकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बुध्दविहारांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात .यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना, हारफुलांऐवजी वह्या पेन, स्पर्धा परीक्षांची पुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांची आदरांजली अर्पण करावी असे आवाहन राजू झनके यांनी केले आहे.
शिक्षणाच्या या वाटचालीसाठी सर्व धम्मबांधवांनी एकजुटीने पुढे यावे, अशी विनंती अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.