Monday, September 22, 2025
घरमहाराष्ट्रसामाजिक बांधिलकी जपत कर्मवीर जयंती साजरी

सामाजिक बांधिलकी जपत कर्मवीर जयंती साजरी

मलकापूर ( ता. शाहूवाडी) : आजच्या वेगवान युगात जिथे प्रत्येकजण स्वतःच्या प्रगतीचा विचार करतो तिथे समाजातील दुर्बल घटकांचा विचार करणे ही खरी सामाजिक जाणीव आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतूनच रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर (पेरीड) मधील इतिहास विभागाने सामाजिक बांधिलकी जपत चनवाड ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंती सोहळ्या निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात कर्मवीरांच्या जयंती सोहळ्यानिमित्त दि. 16 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत विविध शैक्षणिक, सामाजिक, जनजागृती, पर्यावरणीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज उद्धरासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या कर्मवीरांचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातून या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करतेवेळी प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ‘परिस्थितीवर मात करून यशाची उंच शिखरे पादक्रांत करा’ हा अनमोल संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.
यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत गिरी, उपप्राचार्य प्रो. सत्यवान बनसोडे, प्रा. आकाश चव्हाण, प्रा. समाधान समाधान जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
यावेळी आश्रम शाळेचे प्रमुख श्री. बुचडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठी मदत होते आणि त्यांचे मनोबलही वाढते. हे नक्कीच प्रेरणादायी आहे.
वह्या व खाऊ मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद जाणवत होता. हा उपक्रम आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments