सातारा(अजित जगताप): कोरेगाव दि: फलटण- कोरेगाव अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. दीपक चव्हाण यांनी नांदवळ ता. कोरेगाव या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी निधी उपलब्ध केला. परंतु, बौद्ध समाजाच्या वादग्रस्त जागेतच भूमिपूजन करण्याचा घाट घातल्यामुळे अखेर स्थानिक मागासवर्गीय ग्रामस्थ व बहुजन मुक्ती पार्टीचे नेते तुषार मोतलिंगसतिश गायकवाड यांनी हे भूमिपूजन रोखले. आ. दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अखेर दुसऱ्या जागी भूमिपूजन करावे लागले. याबाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे मूळ गाव हे कोरेगाव तालुक्यातील नांदवळ आहे. याच गावामध्ये आरक्षित जागेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन वेळा निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण यांनी यापूर्वी विकास कामे करताना लक्ष दिले नाही. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी घाई गडबडीने निधी टाकून पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी भूमिपूजन घेतले होते. परंतु, सदर भूमिपूजनाची जागा वादग्रस्त असून त्याबाबत निर्णय होण्यापूर्वीच असा प्रकार घडल्यामुळे बहुजन समाज पार्टीचे नेते व स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामीण भागात सर्वत्र विकास कामासाठी बौद्ध समाजाची जागा दिसते का? असा रोखठोक सवाल केला. त्यामुळे उपस्थित निरुत्तर झाले. शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी नांदवळ या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वस्तीमध्ये भूमिपूजनासाठी आलेले होते . पण विरोध वाढू लागल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते व आमदार चव्हाण यांना दुसऱ्या जागी भूमिपूजन करून नांदवळ मधून काढता पाय घेतला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार दीपक चव्हाण यांच्यावर महाविकास आघाडी सोबतच पक्षातीलच काही कार्यकर्त्यांच्या राग आहे. मोठ्या प्रमाणात फलटण- कोरेगाव मतदार संघातील मतदार नाराज असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार दीपक चव्हाण यांची घोषणा केल्यामुळे या मतदारसंघात आ. चव्हाण यांनाच नव्हे तर त्यांच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात आता मतदार व जनतेच्या रागाला सामोरे जावे लागत आहे . त्याची सुरुवात फलटण शहरातून झाली असून हे लोन आता संपूर्ण फलटण कोरेगाव मतदार संघात पसरू लागलेली आहे. फलटणचे सुपुत्र व माढा भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा विरुद्ध दर्शवला आहे. त्यामुळे आता अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
