गोडोली(विजय जाधव) : ऑनलाईन जगतात वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. “सायबर फसवणूक कशी केली जाते, त्याची लक्षणे काय असतात आणि स्वतःचा बचाव कसा करता येतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सायबर फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने जागरूकता ठेवली पाहिजे,” असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश तांबे यांनी केले.
वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च आणि क्विक हिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला.
या कार्यक्रमात तांबे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील धोके, डेटा गोपनीयता, तसेच ऑनलाईन गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सायबर वॉरियर म्हणून केलेल्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
सायबर पोलीस वर्षा खोचे आणि सीमा भुजबळ यांनी विविध प्रकारचे सायबर गुन्हे कसे घडतात आणि त्यापासून खबरदारी कशी घ्यावी, याची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी.एस. सावंत, संगणक विभाग प्रमुख डॉ. आर.डी. कुंभार, प्रा. प्रियांका लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेवर आधारित पथनाट्य सादर केले. प्रा. प्रियांका लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली.