मुंबई : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धगधगती मुंबई या वृत्तवाहिनीने यंदा एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. “नवरात्री प्रेरणा – नऊ दिवस, नऊ यशोगाथा” या शीर्षकाखाली नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
या उपक्रमातून समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या यशस्वी, संघर्षशील आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या कथा लोकांपुढे मांडल्या जाणार आहेत. महिलाशक्ती, समाजकारण, शिक्षण, कला, संस्कृती, उद्योजकता, साहित्य अशा विविध क्षेत्रांत चमक दाखवलेल्या व्यक्तींचा प्रवास या मालिकेतून उलगडला जाणार आहे.
धगधगती मुंबई नेहमीच सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आली आहे. नवरात्रीचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन या उपक्रमाद्वारे नऊ दिवस नऊ प्रेरणादायी कहाण्या प्रकाशित करण्यात येतील.
या उपक्रमात एक खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठ संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे साहेब यांचे सहकार्य. त्यांच्या प्रायोजकत्वाखाली खास बाजारपेठेतर्फे नवदुर्गेला पैठणी भेट देण्यात येणार आहे. नवरात्रीत पारंपरिकतेचा आणि संस्कृतीचा मान राखणारा हा उपक्रम प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणार आहे.
मुख्य संपादक भीमराव धूळप म्हणाले, “नवरात्री हा फक्त देवीपूजेचा उत्सव नाही, तर स्त्रीशक्तीच्या प्रेरणेचा उत्सव आहे. या प्रेरणेतून प्रत्येकाला पुढे जाण्याची उर्जा मिळावी, हीच या उपक्रमामागची खरी भूमिका आहे.”
या मालिकेची सुरुवात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होणार असून दररोज एका नव्या यशोगाथेची भेट वाचकांना मिळणार आहे.