दहिवडी(अजित जगताप) : राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याच माण- खटाव विधानसभा मतदार संघात शेवरी गावातील बौद्ध वस्तीतील समाज मंदिर पाडण्यात आले. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापही कुणालाही अटक झालेली नाही. दरम्यान, याबाबत सत्य पडताळणी करून कार्यवाही केली जाईल. अशी माहिती दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.
याबाबत माहिती अशी की ,संविधान भवनची निर्मिती केल्यानंतर याच शेवरी बौद्ध वस्ती मधील समाज मंदिर सुस्थितीत असल्याने ते पाडू नये. अशी विनंती वजा निवेदन बौद्ध समाजाने ग्रामपंचायत, माण पंचायत समितीला दिले होते. तरीही हे समाज मंदिर अज्ञातांनी जमीन दोस्त केले. त्यामुळे बौद्ध समाजामध्ये गटातटाचे राजकारण उभे राहिले आहे. माण पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी या प्रकरणी चौकशी करून गटविकास अधिकारी यांच्या पत्रानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २३ नुसार आठच्या उताऱ्यावर शेवरी समाज मंदिर म्हणून नोंद आहे. तरीही समाज मंदिर पाडल्यामुळे संबंधित ग्रामसेविका विरोधात कारवाई झालेली आहे. हे समाज मंदिर पाडण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले असल्याचे म्हणणे काही गटाचे आहे. तर याबाबत समाज मंदिर पाडणाऱ्या विरोधात एक मे रोजी आंदोलन केल्यानंतर हे आंदोलन मागे घ्यावे. यासाठी संबधितांनी कारवाईचे आश्वासन दिले होते .असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. शेवरी गावात एखादी घटना घडली तर संपूर्ण तालुक्यामध्ये त्याची चर्चा होते. आणि समाज मंदिर पाडल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल होतो. यातच बरेच काही आलेले आहे.
धार्मिक स्थळांबाबत अनेकांच्या भावना गुंतले असल्यामुळे अशा धार्मिक स्थळांच्या वादावादी बाबत सामंजस्य भूमिका घेतली जात असते. परंतु या ठिकाणी गटातटाचे राजकारण होत असल्याचाही काहींनी संशय व्यक्त केला आहे. दोन्ही बाजूच्या लोकांना वाद मिटवून संवाद घडवून आणावा. अशीही काहींची प्रामाणिक इच्छा आहे. दरम्यान, सदर समाज मंदिराबाबत अनेकदा शेवरी ग्रामपंचायती पंधरा टक्के अनुदानातून खर्च करण्यात आलेला आहे. असे समाज मंदिर कोणाच्या आदेशाने पाडले असेल? सदरचा आदेश व गट विकास अधिकारी यांचे पत्र याचीही चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे. पूर्वीचे समाज मंदिर सुस्थितीत असल्याचे काहींनी पत्राद्वारे कळवले आहे. तरीही रात्रीच्या वेळी समाज मंदिर पाडले आहे. स्थानिक पातळीवर राजकारण बाजूला ठेवून समाजकारण निकोप पद्धतीने व्हावं अशीच अपेक्षा आहे. याबाबत सामाजिक न्याय विभाग व गृह विभागाने समन्वय साधून हा प्रश्न सोडवावा. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ व सोमनाथ धोत्रे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
_______________________
फोटो– शेवरी ता. माण येथील पूर्वीचे समाज मंदिर व जमीन दोस्त केलेली मंदिर




