कराड (ज्ञानेश्वर शेवाळे)नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर न्यायासाठी धावलेल्या पीडित कुटुंबीयांवरच पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी
सरकारवर जोरदार टीका करत, ‘ज्यांना अजितदादांनाच न्याय देता येत नाही, ते सर्वसामान्यांना काय न्याय देणार? असा थेट सवाल उपस्थित करत पीडित कुटुंबीयांवरील लाठीचार्जमुळे राज्यभारत संतापाची लाट उसळली असून, यावरून सरकार व पोलीस प्रशासनामधील संवादाचा अभाव स्पाट दिसून येतो, असे परखड मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
न्याय मागणाऱ्यांवर लाठीचार्ज करणे ही गंभीर चूक असल्याचे सांगत रोहित पवार म्हणाले, नसरापूरमधील घटनेत पीडित कुटुंब न्यायाच्या अपेक्षेने धडपड करत असताना त्यांच्यावरच लाठीचार्ज होणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. प्रशासनाने अशा संवेदनशील प्रकरणात संयमाने वागणे अपेक्षित असताना उलट कठोर कारवाई केल्याने सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला पीडित कुटुंब न्यायासाठी आक्रोश करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री लग्न समारंभात व्यस्त असतात. अशा वागण्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशावरही टीका केली. सत्ता, आमदारकी आणि मंत्रीपदाच्या अपेक्षेने त्यांनी निर्णय घेतला असावा. मात्र आता त्यांना अपेक्षित पद मिळेलच असे नाही, असे सूचक विधान त्यांनी केले.




