ताज्या बातम्या
मराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावरअक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांचा साहित्य संमेलनासाठी खारीचा वाटा

राम सुतार यांच्या निधनाने आंतरराष्ट्रीय कलाविश्वाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्र भूषण आणि पद्मभूषण आदरणीय राम सुतार यांच्या निधनाची आजची बातमी ही आंतरराष्ट्रीय शिल्पकारांना धक्का देणारी ठरली असून जगातील सर्वात उंच शिल्प बनवणारे शिल्पकार म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
पंचशील पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र जाधव आणि मी त्यांच्या मुंबईतील वास्तव्यात कायम सोबत असायचो. ते ही मुंबईला निघताना आम्हाला फोन करायचे, आता तो फोन येणार नाही. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख.

राम सुतार हे नाव पाच खंडात २०० हून अधिक शिल्पे बनवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार म्हणून सर्वपरिचित आहे. यांचा जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील “गोंदूर” येथे झाला. त्यांच्या शिल्पकलेने मी कायमच प्रभावित झालो. संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील महात्मा गांधी यांचे शिल्प यामुळे ते जागतिक प्रतलावर नावाजले गेले. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणातील त्यांची शिल्पे अनेकांना प्रेरणा देत आहेत.
त्यांच्या जीवनातील शताब्दी कार्यामुळे त्यांच्या महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत सत्कार व्हावा अशी माझी इच्छा होती. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिवशी त्यांनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली तेव्हा त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट आणि मनमोकळ्या गप्पा आता होणार नाहीत ही खंत आहे.
त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी त्यांचे नाव सुचवले व कार्यकारिणीने ते लगेच मान्य केले. माझ्या विनंतीला मान देऊन ते मुंबईत आले आणि त्या कार्यक्रमात अनेक पुरस्कार विजेत्या व्यक्तींना सन्मानित केले. याच वेळी पत्रकार संघाच्या वतीने केलेला सत्कार त्यांनी स्वीकारला. ही त्यांची मुंबईतील शेवटची भेट ठरली. आता त्यांचे अखेरचे शिल्प हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुढच्या वर्षात पूर्णत्वास जाईल याची चोख व्यवस्थाही त्यांनी करून ठेवली आहे.
ते कायमच महाराष्ट्राचे भूषण होते, तो सन्मान त्यांना गेल्याच महिन्यात महाराष्ट्राने प्रदान केला. फक्त त्याचा जाहीर कार्यक्रम होऊ शकला नाही ही खंत वाटते.
राम सुतार यांनी १९५४ ते १९५८ दरम्यान अजिंठा आणि एलोरा लेण्यांच्या अनेक पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले. मध्य प्रदेशातील ४५ फूट उंचीचे “चंबळ स्मारक” हे सुतार यांच्या कारकिर्दीतील पहिले मोठे आणि कौतुक झालेले काम होते. हे स्मारक एका खडकापासून बनवण्यात आले होते.
सुतार यांच्या इतर प्रसिद्ध शिल्पांमध्ये दिल्लीतील गोविंद बल्लभ पंत यांचा कांस्य पुतळा, बिहारमधील कर्पुरी ठाकूर आणि बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा यांचा पुतळा, अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा पुतळा आणि गुजरातमधील जगप्रसिद्ध “स्टॅच्यू ऑफ युनिटी” यांचा समावेश आहे. त्यांच्या जागतिक दर्जाच्या कामाबद्दल त्यांना जगभरातून अनेक पुरस्कार मिळाले.

पद्मभूषण राम सुतार यांची काही उल्लेखनीय कार्ये : स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल) – १८२ मी. उंच विश्वातील सर्वात भव्य शिल्प.

चंबळ देवी शिल्प – १९६१ मध्ये चंबळ नदीवरील देवीची ४५ फूट उंच मूर्ती

महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींच्या मूर्त्या – संसद भवनात महात्मा गांधी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू, महाराजा रणजीत सिंह यांच्यासह अनेकांच्या शिल्पांचे काम केले.

केंपे गौडा शिल्प, बंगळुरू – बंगळुरू एयरपोर्टवर असलेले १०८ फूट उंच “स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी”.

नुकतेच मालवण येथील राजकोट किल्ल्यात ९१ फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी शिल्प.

अंतरराष्ट्रीय शिल्पे – ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील महात्मा गांधी मूर्ती; संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील महात्मा गांधीची प्रतिमा यामुळे त्यांच्या कामाचा प्रभाव जागतिक शिल्पकारांवर पडला.

कृष्ण – अर्जुन रथ (ब्रह्म सरोवर, कुरुक्षेत्र) – २००८ साली पत्नी आणि पुत्र अनिल सुतार यांच्या सहकार्याने कांस्यात तयार केलेले १०८ फुटाचे शिल्प.

पद्म श्री, पद्म भूषण , टागोर सांस्कृतिक पुरस्कार आणि आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या शिल्पकाराच्या सान्निध्यात मी जवळजवळ २० वर्षे आहे. अनेक शिल्पे उभी राहताना त्यांच्या सर्जकतेचा एक साक्षीदार म्हणून मलाही कला थोडी कळू लागली.
त्यांच्या कांस्यातील कामगिरीमध्ये निपुणता व त्यांच्या मूर्त्यांमध्ये यथार्थवाद आणि सूक्ष्म भावनांची झलक दिसून येते. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांच्या हजारो छायाचित्रांचा अभ्यास करून सुतार हे त्यांच्या चेहऱ्यांमध्ये आत्मा भरण्याचा प्रयत्न करत असे जाणकार सांगतात.

आपल्या १०० वर्षाची वयोमर्यादा पार केल्यावरही ते नोएडा येथील स्टुडिओमध्ये नवीन प्रकल्पांवर कार्यरत होते. राम सुतार हे केवळ मूर्तिकार नव्हते तर एक इतिहास रचयेते, एक आंतरराष्ट्रीय कला दूत आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारे असाधारण व्यक्तिमत्व होते. त्यांनी आजही नवनिर्माणांच्या प्रवाहात प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे, ज्यामुळे भारतीय मूर्तिकलेला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. जगातील सर्व कलाप्रेमींपुढे प्रेरणात्मक कार्य ठेवले आहे. त्यांना माझे शतशः नमन !

प्रा.हेमंत सुधाकर सामंत (जेष्ठ पत्रकार)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top