वाई(नितीन गायकवाड) :


वाई तालुक्यातील धोम धरणग्रस्त आणि ‘धोम धरण संघर्ष समिती (पश्चिम भाग)’ यांनी संपादीत जमीन मुळ मालकांना परत मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. उपविभागीय अधिकारी, वाई यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मौजे धोम येथील गट नंबर १५३ मधील जमीन वाई नगरपालिका पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येत असून, या जमिनीबाबत ना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली, ना अधिकृत माहिती देण्यात आली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाईपलाईनची मांडणी आणि पाण्याची टाकी बांधण्यासाठी १ गुंठा मागणी नाकारूनही नगरपालिकेला तब्बल १ हेक्टर जमीन कशी दिली गेली, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पश्चिम भागातील २५ टक्के पुनर्वसन अद्याप बाकी आहे. ५० वर्षांपासून ४०० ते ५०० कुटुंबे शेतीवरच उदरनिर्वाह करत असून, जलसंपदा विभागाकडून अचानक मालकी हक्क दाखवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
मुळ मालकांना जमीन परत देण्याच्या मागणीसाठी १२ डिसेंबर २०२५ रोजी धोम गावात एक दिवसीय ठिय्या आंदोलन होणार असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली.
निवेदनाची प्रत तहसिलदार, पोलीस स्टेशन वाई यांना देण्यात आली असून, हा प्रश्न मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मतदारसंघात गंभीर स्वरूप धारण करत आहे.




