नवी मुंबई(भीमराव धुळप) : पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या लेडीज डब्यात आज एक 16 वर्षीय मुलगा डोळे पुसत रडताना दिसला. कोणी पाहू नये म्हणून तोंड लपवत असलेल्या या मुलाचं नाव बंटी घुटन. त्याच्याशी संवाद साधल्यावर उघडकीस आलेली कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे.
कानातले,बांगड्या विकून घर चालवणारा बंटी, ठाण्यातील शिवाजी नगर येथे आई आणि दोन लहान भावंडांसोबत राहतो. वडील वारले, आई आजारी — त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अवघ्या 16 वर्षांच्या या मुलावर अवलंबून आहे.
बंटीने सांगितल्याप्रमाणे धक्कादायक प्रकार असा आहे,
कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याचा साडे नऊ हजार रुपयांचा माल जप्त केला. माल परत मिळवण्यासाठी ₹2,500 देणे अनिवार्य असल्याचं पोलिसांनी सांगितल्याचा आरोप बंटीने केला. त्याच्याकडे एक Paisa नसल्याने तो पनवेलमध्ये काम करणाऱ्या मित्राकडे उसने पैसे मागण्यासाठी जात होता.
“पैसे नाहीत” असे सांगितल्यावर पोलिसांनी दोन दिवसाची मुदत देत “पैसे आण नाहीतर माल विसर!” असे शब्द वापरल्याचा आरोप त्याने केला. त्याने गयावया केल्यावरही दया न दाखवता त्याला मारहाण केल्याचेही गंभीर दावे या मुलाने केले. कारण तो ‘हप्ता’ देत नव्हता, असा आरोप त्याने केला.
ट्रेनमध्ये विक्री अनधिकृत असली तरी
“तो चोरी करत नव्हता… व्यवसाय करत होता… घर चालवण्यासाठी संघर्ष करत होता”
असा प्रश्न उपस्थित करत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गरीब, अल्पवयीन मुलावर अशी कठोर कारवाई?
चोरी न करता उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्याला त्रास का? फ्रॉड, गुन्हेगार, टोळ्या यांच्यावर कारवाई सोडून गरीब मुलांकडे बोट? कल्याण रेल्वे पोलिसांची ही मुजोरी की लाचखोरी? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. बंटी घुटन या मुलाला न्याय मिळावा, संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी आणि वाढत्या अन्यायाला आळा बसावा — अशी ठाम मागणी प्रवाशांकडून व सामाजिक माध्यमांतून होत आहे.
गरिबाच्या डोळ्यातील अश्रूंना न्याय मिळेल का?
अल्पवयीन बंटीला न्याय मिळावा म्हणून ही घटना पुढे आणण्यात येत आहे.




