मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे, ही अभिमानाची बाब आहे. या राज्यगीतात एक ओळ आहे की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आता ही ओळ बदलून ‘दिल्लीच्या तख्तावर बैसतो महाराष्ट्र माझा’ असे म्हणण्याची, नव्हे तर ती कृतीत आणण्याची वेळ आली आहे. किती काळ दिल्लीच्या तख्ताला राखणार, आता या दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राने बसण्याची वेळ आली आहे. यासाठी निखळ, शुध्द, पवित्र भगव्या झेंड्याखाली मराठी माणसाने एकवटण्याची नितांत गरज आहे, अशा सुस्पष्ट शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई यांनी ठणकावून सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित श्री. अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त बोरीवली पूर्व येथील शिवसेवा सामाजिक शिक्षण संस्थेच्या सभागृहात अभीष्टचिंतन सोहळा तसेच ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’ या विषयावर शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपल्या दोन तासांच्या घणाघाती व्याख्यानात राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांचा खराखुरा इतिहास समजावून सांगितला आणि काही गोष्टी कशा खोट्या पद्धतीने पसरविण्यात येत आहेत, ते सप्रमाण दाखवून दिले. अनेक गोष्टी दंतकथा म्हणून पसरविण्यात येत असून खरा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे, राज्य सरकारने यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असेही त्यांनी परखडपणे सांगितले. राजाभिषेक, घोरपड, हिरकणी या संदर्भात खरा इतिहास त्यांनी सांगितला. ‘मातीसाठी कसे जगायचे’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि ‘मातीसाठी कसे मरायचे’ हे छत्रपती शंभूराजे यांनी दाखवून दिले असल्याचे शिवभक्त श्री राजू देसाई यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष, माजी शाखाप्रमुख श्री. राजा खोपकर यांनी दादासाहेब शिंदे यांना शाल श्रीफळ आणि छत्रपती शंभूराजे लिखित ‘बुधभूषण’ पुस्तक देऊन सन्मानित केले तर शिव वाहतूक सेनेचे पदाधिकारी शाम साळवी यांच्या शुभहस्ते शिवभक्त श्री राजू देसाई यांना सन्मानित केले. दादासाहेब शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास, राजू देसाई यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस तर मागाठाणे विधानसभा प्रमुख रेखा बोऱ्हाडे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. “संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळची परिस्थिती निर्माण झाली आहे” असे ठणकावून सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाम कदम यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले तर वसंत तांबे यांनी आभार प्रदर्शन केले. परळ येथील शिरोडकर माध्यमिक विद्यालयातील शिवभक्त श्री राजू देसाई यांचे शिक्षक श्री. सीताराम शिंदे, शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी, दादासाहेब शिंदे यांचा परिवार व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शिवचरित्राचे व्याख्यान आणि अभीष्टचिंतन सोहोळ्यासाठी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, माजी नगरसेवक बाळ राणे, माजी शाखाप्रमुख ॲड संदेश नारकर यांनी शिवसेवा सामाजिक शिक्षण संस्थेचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले तसेच शिवसेना शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, दिनेश विचारे, ओम नारकर, सिमिंतिनी नारकर, शिवसेना उपशाखा संस्कृतीचे क्रियाशील कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.




