मुंबई(महेश कवडे) : उद्या शारदीय नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होत असून घरोघरी, मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडपांमध्ये देवीच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काही भागांमध्ये उड्डाणपुलांचे नूतनीकरण सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
काल व आजपासूनच अनेक मंडळांनी देवीच्या मूर्तींचे आगमन वाजतगाजत, ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत करण्यात आले. भक्तीभाव, आनंद व उत्साहाचे वातावरण सर्वत्र पसरले आहे.
उद्या घटस्थापनेनंतर नवरात्र उपास, व्रत व आराधना सुरू होणार असून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा, आरती व जागर आयोजित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर फुल मार्केट, लालबाग व परळ परिसरात मोठी गर्दी दिसून आली.
शहरात ठिकठिकाणी आकर्षक मंडप उभारले गेले असून सुरक्षेची व स्वच्छतेची विशेष काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.