मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींचा पराक्रम आणि स्त्रीशक्तीची परंपरा नव्या पिढीपुढे उभी करण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात वार्षिक सोहळा शेकडो विद्यार्थी, पालक आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीने उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना आनंद दिला.
सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक-लेखक प्रवीण भोसले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “शिक्षणाचा उपयोग केवळ प्रमाणपत्रापुरता न राहता दैनंदिन आयुष्यात आणि आवडीच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवण्यासाठी करावा.वैयक्तिक आयुष्यात शिक्षणाची पात्रता सिद्ध करायला लागते. आज तुमचा शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे, घेतलेल्या शिक्षणाचा रोजच्या व्यवहारात वापर कसा करणार आहात, हे जसे खरे आहे तसेच तुम्हाला इतर ज्या क्षेत्रात आवड आहे त्यात तुमचे अंगीकृत गुण दाखवत यशस्वी जीवनाला सामोरे जावे लागणार आहे. शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा प्रताप — असे म्हणताना इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या रणरागिणी डोळ्यासमोर येतात. मातोश्री जिजाबाई, महाराणी येसूबाई, ताराराणी, यलम्मा, पुण्यश्लोक अहिल्याबाई, विरांगणा रायबागन या स्त्रिया भावनांवर विजय मिळवत प्रत्येक आव्हानाला सामोरे जात होत्या. त्या स्वराज्यसेवक वीरांचा आधार होत्या आणि अप्रत्यक्षपणे स्वराज्यासाठी लढत होत्या. आजही स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. तुम्हीही त्यांचा आदर्श घ्यावा.”
विशेष पाहुणे म्हणून उपस्थित एनएसजी कमांडो नरेश पवार यांनी आपल्या लष्करी अनुभवांची माहिती दिली. ते म्हणाले, “पठाणकोट हल्ला, जम्मू-काश्मीरमधील कारवाया, पुंछ येथे बॉर्डरपार ऑपरेशन — सलग तीन वर्षे पाकिस्तानविरोधात कार्य करताना आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो. नुकतेच यशस्वी झालेले सिंदूर ऑपरेशन जाहीर करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन धाडसी महिला होत्या. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग सैन्यदलासाठीही करता येतो, प्राधान्याने देशसेवा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.”
छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत समाजकार्याचा पाया ठरावेत, या ध्येयाने कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार २०२५ मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक रवींद्र मालुसरे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “स्वराज्य हे शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवले, संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. या यज्ञात असंख्य मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र धर्म काय असतो हे जगाला कळाले. या इतिहासाचा विसर मराठी माणसाला पडता कामा नये. मालुसरे कुळात जन्म झाल्याने सुभेदारांचा इतिहास पुढे आणणे हे मी कर्तव्य समजतो आहे.
संस्थेचे प्रमुख डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, “बारावीनंतर मुलींनी स्वावलंबी व्हावे, ही संकल्पना घेऊन मी डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूट सुरू केले. आज ते पॅरामेडिकल क्षेत्रात देशभरात महत्त्वाचे स्थान मिळवून आहे. होमगार्ड प्रमुख म्हणूनही काम केल्यामुळे त्या कठोर शिस्तीमुळे अनेक मुली माझ्यावर बापासारखा विश्वास ठेवतात.” तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य देशातील विविध भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलची स्थापना केली असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती राजाराम महाराज या काळातील इतिहास मी ग्रंथरूपाने इंग्रजी-मराठीसह इतर भाषामध्ये प्रकाशित केला आहे.
सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय शिवकालीन रणरागिणी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. डॉ. अनुज अविनाश केसरकर, मुंबई (प्रथम क्रमांक), प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे, ठाणे (द्वितीय क्रमांक), सुमिता अभिषेक पवार, मुंबई (तृतीय क्रमांक ), स्नेहल गोविंद चव्हाण, रत्नागिरी आणि हिमांशू विजय शुक्ल, जळगाव (उत्तेजनार्थ ) यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, ज्येष्ठ पत्रकार राजन देसाई, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक दिलीप दळवी, रामचंद्र जयस्वाल, राजेंद्र मालुसरे, जयवंत मालुसरे, संजय धामापूरकर, अजय नागवेकर उपस्थित होते.
सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, युक्ता गोठणकर आणि आरती लोखंडे यांनी केले. आर्णा सुर्वे, साक्षी निर्मल, गौरव गायकवाड, समिक्षा बिळीगुदरी आणि साहिल धाकतोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
शिवकालीन रणरागिणींच्या स्मृती जागवणारा प्रेरणादायी सोहळा रवींद्र मालुसरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
RELATED ARTICLES