नवी मुंबई : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यास 17 सप्टेंबर पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रारंभ झाला असून शासन निर्देशानुसार 2 ऑक्टोबर पर्यंतच्या अभियान कालावधीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात महिला व बालकांच्या आरोग्य तपासणीस प्रारंभ झाला आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात या अभियानास सुरुवात करण्यात आली असून अभियानाच्या पहिल्याच दिवशी 3862 महिला व बालकांनी अभियानांतर्गत तपासणी आणि गरजेनुसार औषधोपचारांचा लाभ घेतला आहे.
यामध्ये महिलांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या आरोग्य तपासणी अंतर्गत उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठीची तपासणी तसेच कर्करोगाच्या निदानासाठी तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे माता बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा व लसीकरण, महिला व किशोरवयीन मुलींची रक्तक्षय निदानासाठीची तपासणी आणि समुपदेशन करण्यात येत आहे. याशिवाय क्षयरोग होण्याची अतिजोखीम असलेल्या महिलांची क्षयरोग निदान तपासणी, सिकलसेल रोग (SCD) तपासणी त्याचप्रमाणे SCD कार्डचे वितरण आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक व घसा रोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक इत्यादी तज्ज्ञांच्या सेवा पुरविण्यात येत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेची 3 सार्वजनिक रुग्णालये, 2 माता बाल रुग्णालये व 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी महिला व बालकांच्या आरोग्य तपासणीची विशेष शिबीरे या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आली आहेत. 17 सप्टेंबर रोजी अभियानाच्या पहिल्या दिवशी 1450 महिलांनी तपासणीचा लाभ घेतला असून 1454 महिलांनी कर्करोग स्क्रिनींग करुन घेतली आहे. तसेच 1023 मुले व 923 मुलींचीही आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली आहे.
या व्यतिरिक्त अवयवदान जागृती, समुपदेशन, सर्व लाभार्थी यांचे आयुष्मान कार्ड तसेच आभा (ABHA) कार्ड तयार करण्यात येत आहेत. तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य सुविधांच्या ठिकाणी उपलब्ध् करुन दिलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आयोजित तपासणी शिबीरांना महिला व बालकांचा चांगला प्रतिसाद लाभतांना दिसत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिलांनी आपली व आपल्या बालकांच्या आरोग्याची विनामूल्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.