तळमावले/वार्ताहर :पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001ः2015 मानांकन प्राप्त मिळाल्यामुळे ट्रस्ट च्या कर्तृत्वावर गुणवत्तेची आणि दर्जाची मोहोर उमटली आहे. ट्रस्टने सन 2014 पासून संदीप डाकवे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्रभर काम करुन राबवलेल्या उपक्रमांचा एकप्रकारे सन्मान झाला आहे. काही दिवसापूर्वीच सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम यांनी स्पंदन गौरव गीत प्रदर्शित केले आहे.
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी हे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमांना समाजातून नेहमी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, आ.शिवेंद्रसिंहराजे भोंसले, छत्रपती संभाजीराजे, माजी खा.श्रीनिवास पाटील, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड, माजी आ.बाळासाहेब पाटील यासह अन्य मान्यवरांनी शुभसंदेश देवून ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार, सेवाव्रती पुरस्कार इत्यादी पुरस्कारानी ट्रस्ट ला गौरवले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001ः2015 मानांकन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला मिळाल्याबद्दल संदीप डाकवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, माजी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, बाळासाहेब कचरे, वांगव्हॅली पत्रकार संघ, सांची सुपरस्टार संघ, शिवछत्रपती प्रतिष्ठान डाकेवाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*चौकटीत : आयएसओ 9001ः 2015 मानांकनामुळे आणखी जबाबदारी वाढली :*
आयएसओ 9001ः 2015 मानांकनामुळे स्पंदन ट्रस्ट ने आतापर्यंत समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव झाला आहे. ट्रस्ट ला विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी कळत नकळत मदत केलेल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. या मानांकनामुळे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या कर्तृत्वावर अभिमानाची मोहोर उमटली असून आणखी जबाबदारी वाढली आहे, अशी भावना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ट्रस्टचे मार्गदर्शक प्रा.ए.बी.कणसे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.