कराड(प्रताप भणगे) : वाहतूक संघटना संयुक्त महासंघ यांच्यावतीने चालक दिनानिमित्त राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथील बेरिया हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कराड येथील क्रांती ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुनील नारायण पाटील यांना यंदाचा उत्कृष्ट राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते, तर महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे (आबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
गेल्या ४० वर्षांपासून सुनील पाटील रिक्षा चालक म्हणून अपघातमुक्त व जबाबदार सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध वाहनचालना आणि प्रवाशांशी नम्र वर्तनामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवू शकले आहेत. 1985 पासून ते क्रांती ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.फक्त रिक्षा चालक म्हणूनच नव्हे तर समाजसेवक म्हणूनही सुनील पाटील यांचे योगदान लक्षणीय आहे. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी रुग्णवाहतूक सेवेत अत्यल्प दर आकारले, तर अनेक प्रसंगी मोफत सेवाही उपलब्ध करून दिली. त्यामुळे असंख्य गरजू रुग्णांचे प्राण वाचले. तसेच संघटनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रिक्षा चालकांना मदतीचा हात दिला आहे.
यावर्षी या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमधून शेकडो अर्ज आले होते. त्यामधून काटेकोर निकषांनुसार केवळ 60 जणांचीच उत्कृष्ट चालक म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये कराडचे सुनील पाटील यांची निवड होणे ही कराडसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास पांडुरंग सूर्यवंशी, आरिफ बागवान, अशोक खवळे (बनवडी), बाबू शिंदे (नांदलापूर) यांच्यासह राज्यभरातील अनेक रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सुनील पाटील यांचे क्रांती ऑटो रिक्षा संघटना तसेच विविध वाहतूक संघटनांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कराडचे सुनील पाटील यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट ‘चालक रत्न’ पुरस्काराने सन्मान
RELATED ARTICLES