Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रधारावीत ८० हजार झोपड्यांवर नंबर पडले; ४५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

धारावीत ८० हजार झोपड्यांवर नंबर पडले; ४५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

प्रतिनिधी : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणात नोंद न झालेल्या सर्व रहिवाशांनी सामील व्हावे; अन्यथा ते घरासाठी अपात्र ठरतील, याकडे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी लक्ष वेधले आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार धारावीतील ८० हजार झोपड्यांवर नंबर पडले असून ४५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

घरोघरी प्रत्यक्ष जाऊन केल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणात कागदपत्रांसह माहिती देण्यात असहकार करणाऱ्या रहिवाशांकडे सर्वेक्षणासाठी पुन्हा न जाण्याचे अधिकाऱ्यांनी निश्चित केले आहे. रहिवाशांच्या घरी तीन-चार वेळा जाऊनही त्यांनी दाद न दिल्याने तसे फलकही लावण्यात आले आहेत. आता काही कारणांमुळे सर्वेक्षणाच्या वेळेस उपलब्ध न राहिलेल्या रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची प्रक्रिया धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या या सर्वेक्षणात रहिवाशांकडून कागदपत्रे जमा केली जातात. त्यांची पडताळणी केल्यानंतर ते सिस्टिम मध्ये अपलोड केले जातात.त्याचबरोबर प्रत्यक्ष रहिवाशांच्या घरी जाऊन घराचे मोजमाप देखील घेतले जाते. सगळी कागदपत्रे योग्य आहे, हे निश्चित झाल्यावरच ही प्रक्रिया पूर्ण होते.

… तर संपर्क साधा घरोघरी प्रत्यक्ष जाऊन केल्या जाणाऱ्या धारावीतील सर्वेक्षणात कागदपत्रांसह माहिती देण्यात असहकार करणाऱ्यांकडे यापुढे सर्वेक्षणासाठी न जाण्याचे आम्ही निश्चित केले आहे. नाईलाजाने परिशिष्ट २ च्या मसुद्यात या लोकांची कागदपत्रे मिळाली नाहीत.भविष्यात जर त्यांना घराचे सर्वेक्षण करून घ्यायचे असेल, तर त्यांना फलकांवर नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून सर्वेक्षण करून घ्यावे लागेल, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

जमीन देण्यास विरोध धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मिठागराची जमीन देण्यात येऊ नये म्हणून मुलुंडकरांनी आवाज उठविला असून, मालावणीमध्येही जमीन देण्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. पुनर्विकासाविरोधात लढणाऱ्या संस्थांसोबतच राजकीय पक्ष आजही घर धारावीतच मिळावे म्हणून आपल्या भूमिकांवर ठाम आहे. दुसरीकडे प्रकल्पाने सर्वेक्षणावर जोर देत ही प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

४५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित झोपडीधारकांनीही आपल्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments