Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रपासष्टावा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना  

पासष्टावा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना  

प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व जनतेला उद्देशून संदेश दिला.  

यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.  राज्यपालांच्या भाषणाच्या मराठी, इंग्रजी व हिंदी प्रती जोडल्या आहेत.

मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते. 

यावेळी राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, मुंबई अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज व बृहन्मुंबई अग्निशमन दल यांचा समावेश असलेल्या निशाण टोळ्या, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा तसेच ब्रास बँड व पाईप बँड वाद्यवृंद पथकाने दिमाखदार संचलन केले.

संचलनात बृहन्मुंबई पोलीस विभागाची ४ महिला निर्भया पथके व मुंबई अग्निशमन दलाची अत्याधुनिक वाहने देखील सहभागी झाली होती.   

मान्यवरांच्या भेटी व शुभेच्छा

कार्यक्रमानंतर राज्यपालांनी उपस्थित विविध देशांचे मुंबईतील राजदूत – वाणिज्यदूत तसेच सैन्य दलांचे व शासनाचे वरिष्ठ अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी यांचे जवळ जाऊन त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महानगर पालिकेतर्फे राज्य स्थापना दिन साजरा  

मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकला. यावेळी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. 

पालिकेच्या संगीत अकादमीच्या वाद्यवृंदाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे वाद्य संगीताच्या माध्यमातून सादरीकरण केले. राज्यपालांनी संगीत अकादमीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments