ताज्या बातम्या

एकल महिला दिनानिमित्त नवी मुंबईत आठ ठिकाणी विविध उपक्रम संपन्न

नवी मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केल्यानुसार दि. 23 जून या आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या बालविकास विभागाच्या वतीने सूचित करण्यात आल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकल महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हे कार्यक्रम यशस्वी केले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दोनशेव्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्र शासन, राज्य शासन व महानगरपालिका यांच्यामार्फत एकल महिलांसाठी रोजगार, स्वयंरोजगार व उपजिविका याकरीता राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून विकास होण्याच्या दृष्टीने बचत गटाचे महत्व विशद करुन बचत गट स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया व माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे एकल महिलांना जाणवणा-या समस्या व त्याबाबतच्या सूचना आणि आक्षेप जाणून घेण्यात आले.

याप्रसंगी समाजविकास विभाग बेलापूर भवन सेक्टर 11 सीबीडी बेलापूर येथे नगरसेविका श्रीम. स्वाती गुरखे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नमुंमपा शाळा क्र. 12 सारसोळे येथे महिला व बालकल्याण समिती उपसभापती श्रीम.रूपाली भगत व नगरसेविका श्रीम.माधुरी सुतार, नमुंमपा शाळा क्र. 28 सेक्टर 15 वाशी येथे नगरसेविका श्रीम.अंजली वाळुंज, नमुंमपा ग्रंथालय सेक्टर 5 सानपाडा येथे प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.शैला पाटील, नमुंमपा महिला सक्षमीकरण केंद्र सेक्टर 10 कोपरखैरणे येथे नगरसेविका श्रीम.वर्षा डोळे व श्रीम.दिक्षा कचरे, नमुंमपा महिला सक्षमीकरण केंद्र सेक्टर 6 घणसोली येथे व नमुंमपा ग्रंथालय सेक्टर 5 ऐरोली येथे मान्यवर उपस्थित होते. तसेच नमुंमपा ग्रंथालय दिघा येथे नगरसेविका ॲड.श्वेता काळे, श्रीम.प्रतिक्षा पाटील, श्रीम.अरूणा शिंदे उपस्थित होत्या. त्यांनीही उपस्थित महिलांशी संवाद साधून जास्तीत जास्त महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

समाजविकास विभागाच्या वतीने महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार यांच्या समन्वयातून, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे सूचनेनुसार, अति. आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या माध्यमातून 8 ठिकाणी आयोजित या उपक्रमामध्ये एकल महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. समाजविकास अधिकारी तसेच समाजसेवक व समुह संघटकांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.

Scroll to Top