ताज्या बातम्या

हौसाई विद्यालय, मलकापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मलकापूर(प्रताप भणगे) : हौसाई विद्यालय, मलकापूर येथे दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयातील १२७ विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून योग दिनाचे आकर्षक बोधचिन्ह साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी शारीरिक शिक्षण शिक्षक ऋषिकेश पोटे यांनी योग दिनाचे महत्त्व विशद करताना योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य जपले जाते, असे सांगितले. लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांकडून विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रकार करून घेतले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी योग दिनाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले. योगासने व प्राणायामामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात, पचनक्रिया सुधारते तसेच मानसिक शांतता, दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी योग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “वसुधैव कुटुंबकम्” या भावनेतून संपूर्ण जगाला एकत्र आणणारा योग दिन हा केवळ आरोग्याचा उत्सव नसून जागतिक ऐक्याचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून संयुक्त राष्ट्रांच्या घोषणेनंतर २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन अधिकृतपणे जगभर साजरा केला जात आहे. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे, हा योग दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास प्राचार्य सतीशकुमार सावळकर, पवार मॅडम, पाटील मॅडम, बालाजी मुंडे, प्रकाश बाबर, खुरपे सर, नायकवडी सर, धनाजी पाटील, हिंगमिरे मॅडम, सुधाकर कांबळे, रघुनाथ पाटील, चव्हाण सर, विकास शिंगाडे, किरण कुंभार, अशोक साठे, महेंद्र आंबवडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top