मुंबई (ओमकार धुळप) : “महाराष्ट्र बाजारपेठ – आपली बाजारपेठ” या ब्रीदवाक्याखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र बाजारपेठ संस्थेचा ९ वा वर्धापन दिन व गुणगौरव पुरस्कार सोहळा दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. १ मे २०१७ रोजी स्थापन झालेली ही संस्था आता आपल्या कार्याचा विस्तार करत १० व्या वर्षात पदार्पण करत आहे.
गुरुवार, ७ मे रोजी आयोजित या भव्य सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सीईओ सौ. अनुजा दांडगे यांचेही विशेष योगदान लाभले.
या सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणत त्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाला मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित कलाकार आणि मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये पार्श्वगायिका कविता राम, अभिनेत्री साक्षी गांधी, प्राजक्ता केळकर, अभिनेते अनिकेत केळकर, कोरिओग्राफर दीपिका जाधव, भूमी जाधव, निर्माते कुडाळकर तसेच विधानसभा सचिव डॉ. विलास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली.
विशेष म्हणजे, कार्यक्रमादरम्यान अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने काही काळ अंधाराचे वातावरण निर्माण झाले. मात्र, उपस्थित महिलांनी मोबाईलचे टॉर्च सुरू करून डॉ. कौतिक दांडगे आणि अनुजा दांडगे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या अनोख्या स्वागतामुळे सभागृहात भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात महिलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. पार्श्वगायिका कविता राम यांच्या गाण्यांवर महिलांनी ठेका धरत संपूर्ण वातावरण आनंदमय केले.
या सोहळ्यात युवा पत्रकार ओमकार भिमराव धुळप यांनाही गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालन संतोष लिंबोरे पाटील यांनी उत्कृष्टरीत्या सांभाळले.
अशा उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्र बाजारपेठेचा ९ वा वर्धापन दिन सोहळा दिमाखात पार पडला.




