मुंबई : निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित ‘संवादभूषण’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच उत्साहात पार पडले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, कार्यकारिणी सदस्य राजेश खाडे तसेच माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
हा कार्यक्रम लोणावळा येथील पत्रकार संघाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या विश्रामधामात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी समयोचित मनोगते व्यक्त करत पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन प्रसाद मोकाशी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘संवादभूषण’ हे भुजबळ यांचे अकरावे पुस्तक असून, यात पत्रकारिता, साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या प्रेरणादायी जीवनकथांचा समावेश आहे. छायाचित्रकार अनिल शाह, प्रा. डॉ. बाबासाहेब काझी, निवृत्त दूरदर्शन अधिकारी अशोक डुंबरे, राम खाकाळ, निवेदिका शिबानी जोशी, तसेच कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमकर्मी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
हे पुस्तक विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या संघर्ष आणि यशाची कहाणी सांगणारे असून, वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.




