ताज्या बातम्या

नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभेत विविध नागरी सुविधा कामांना मंजूरी

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या विविध नागरी प्रस्तावांना स्थायी समिती सभापती श्री. अशोक भासो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाली.

यामध्ये शिरवणे यथील दत्तकृपा वाडी या ठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्यामुळे नागरिकांना होणार त्रास दूर करण्यासाठी रु. 28 लक्ष 85 हजार रक्कमेच्या रस्ते सुधारणा कामास मंजूरी देण्यात आली. त्याचप्रमाणे वाशी विभागात से.11 जुहूगाव येथील पाण्याच्या टाकी जवळील परिसरात गटारांची अवस्था खराब झाल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही तसेच पदपथांचीही दूरवस्था झाल्याने नागरिकांना चालतांना त्रास होतो हे लक्षात घेन त्याठिकाणी रु. 71 लक्ष 87 हजार रक्कमेच्या गटारे व पदपथ सुधारणा कामास आणि वाशी मुख्य रस्त्यालगत हायवे जवळील से.1 डी टाईप बिल्डींग पासून ते से.2 आरती सोसायटी पर्यंत गटर व पदपथ सुधारणा करण्याच्या रु.2 कोटी 90 लक्ष इतक्या रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली.

अशाचप्रकारे से.11 जुहूगाव येथील गटारे खराब झाल्याने त्याठिकाणीही रु.27 लक्ष 98 हजार रक्कमेच्या गटारे सुधारणा कामास तसेच बेलापूर विभागातील नेरुळ से.21 शंकराचार्य उद्यानासमोरील गटर व पदपथ सुधारणा कामाची साधारणत: रु. 61 लक्ष 32 हजार रक्कम मंजूर करण्यात आली. याशिवाय नेरुळ से.20 येथे शिवम अपार्टमेंट ते श्री विला पर्यंतच्या गटारांची दूरवस्था दूर करण्यासाठी रु.35 लक्ष 50 हजार रक्कमेच्या गटर सुधारणा कामाला मंजूरी मिळाली.

नेरुळ से.18 येथील श्री गणेश तलावाच्या भोवती असणा-या कुंपण भिंतींची अवस्था खराब झाली असून या कुंपण भिंतीचे सुधारणा काम साधारणत: रु. 36 लक्ष 72 हजार खर्च करुन करण्यास तसेच आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2024-25 या निधीतून पिंपरी गाव येथे केदारेश्वर महाकाली परिसरात स्थानिक नागरिकांच्या समारंभासाठी श्री. राजेश मोरे यांच्या आमदार निधीतून सभामंडप बांधणे कामासाठी रु. 40 लक्ष 40 हजार खर्चास मान्यता मिळाली.

वाशी येथील पामबीच रोड कोपरी सिग्नल ते पामबीच गॅलेरिआ मॉल तसेच के स्टार हॉटेल ते अरेंजा कॉर्नरपर्यंतच्या रस्ता दुभाजकांमध्ये एफआरपी ग्रील बसविण्याच्या रु. 1 कोटी 17 लक्ष रक्कमेच्या कामास मंजूरी प्राप्त झाली. पामबीच रोडवर मोठया प्रमाणात वाहनांची रहदारी असते. हा परिसर प्रामुख्याने वाणिज्य व रहिवासी परिसरातील असल्यामुळे या रस्त्यावर तुर्भेकडून वाशीकडे येतांना व वाशीकडून तुर्भेकडे जातांना दुभाजक मार्ग आलांडतांना अपघात होत असल्याचे निर्देशनास आले आहे. हे टाळण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये ग्रील लावण्यात येत आहे.

करावे गाव येथे भंगारवाल्याजवळ 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शौचालयाची अत्यंत दूरवस्था झाली असून हे धोकादायक अवस्थेतील शौचालय वापरासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. मात्र त्यामुळे परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तेथील जुने शौचालय तोडून एक मजली नवीन सामुदायिक शौचालय बांधण्याच्या रु. 58 लक्ष 65 हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे वाशी विभाग क्षेत्रातील महानगरपालिकेच्या इमारती, शाळा व रुग्णालये येथील विद्युत साहित्य यांची सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्ती करणे कामाच्या सहा महिन्याच्या मुदतवाढीस मंजूरी देण्यात आली.

शाळा व्हिजन अंतर्गत उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच लक्ष दिले आहे. त्यादृष्टीने नेरुळ से.16 ए येथील नमुंमपा शाळा क्रमांक 9 च्या इमारतीची संपूर्ण दुरुस्ती व सुधारणा करण्याच्या रु.61 लाख 77 हजार रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली.

बेलापूर विभागात 9 पीबीआर ते से.58 ए नेरुळ येथील अमर सोसायटी समोरील ग्रीन बेल्ट मधील नाल्याच्या सुधारणा कामाच्या साधारणत: 1 कोटी 11 लक्ष रक्कमेस मंजूरी प्राप्त झाली आहे.

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात सुरु असलेल्या पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण संस्थेत सन 2024-25 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून सन 2026-27 करिता भूलतज्ज्ञ, विकृती शास्त्र, सुक्ष्मजीव शास्त्र, विकिरण शास्त्र, सामुदायिक वैद्यकशास्त्र, नेत्र रोग, कान नाक व घसा संबधित एकूण 7 अभ्यासक्रमांकरिता प्रत्येक विषयाकरिता 30 विद्यार्थी अशी मान्यता मिळालेली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनी विहित केलेल्या नियमावलीनुसार नमुंमपामध्ये किमान 2 वर्ष कार्यरत असलेल्या दोन विशेष तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी यांना वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून नियुक्ती देण्यास परवानगी देण्यात आली.

अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये विविध सुविधा कामांना तसेच सेवांना मंजूरी मिळाली असून याव्दारे नागरिकांना आवश्यक अशा नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Scroll to Top