मुंबई : प्रभाग क्रमांक १२९ मधील घाटकोपरच्या चिराग नगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात वापरण्यात येणाऱ्या वॉटर टेबलच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला होता. या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची तक्रार समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांसह नम्रसेविका कांचन प्रशांत बढे-तारी आणि पत्रकार प्रशांत दिलीप बढे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित बाबींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. तसेच याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदवण्यात आली.
सोशल मीडियावर हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत निकृष्ट दर्जाचे लावण्यात आलेले वॉटर टेबल काढून टाकले आणि त्याऐवजी नवीन व योग्य दर्जाचे वॉटर टेबल बसविण्याची कारवाई केली.
स्थानिकांच्या मते, ही कारवाई म्हणजे जागरूक नागरिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उचललेल्या आवाजाचा विजय आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा, तसेच निकृष्ट कामांना आळा बसावा, यासाठी पुढेही अशीच सजग भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे.




